Mumbai local: मुंबईत आज मध्यरात्रीपासून 'या' मार्गावर मोठा ब्लॉक! 215 लोकल फेऱ्या रद्द; वाचा सविस्तर
Mumbai local train block : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हा नवीन मार्ग जलद गतीच्या रुळांना जोडण्यासाठी आणि इतर तांत्रिक कामांसाठी आज (मंगळवार) मध्यरात्रीनंतर 'अप' आणि 'डाऊन' या दोन्ही जलद मार्गांवर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे एकूण २१५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

ब्लॉकचे वेळापत्रक आणि परिणाम
- रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या ब्लॉकचा परिणाम दोन दिवस जाणवणार आहे:
- मंगळवारी (आज): ९३ लोकल फेऱ्या रद्द.
- बुधवारी: १२२ लोकल फेऱ्या रद्द.
- ब्लॉकची वेळ: * अप जलद मार्ग: मंगळवार मध्यरात्री १२ ते बुधवार सकाळी ५:३० पर्यंत.
- डाऊन जलद मार्ग: मंगळवार मध्यरात्री १ ते बुधवार सकाळी ४:३० पर्यंत.
या काळात पाचव्या मार्गिकेवरील वाहतूकही पूर्णपणे बंद राहणार असल्याने, धावणाऱ्या काही लोकल गाड्या विलंबाने धावण्याची शक्यता आहे. यामध्ये १२ डबे, १५ डबे आणि एसी (AC) लोकल सेवांचाही समावेश आहे.
विनातिकीट प्रवाशांकडून १५५ कोटींचा दंड वसूल
ब्लॉकच्या बातमीसोबतच पश्चिम रेल्वेने दंडात्मक कारवाईची आकडेवारीही जाहीर केली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२५ या नऊ महिन्यांच्या कालावधीत पश्चिम रेल्वेने तिकीट तपासणी मोहिमेद्वारे तब्बल १५५.४६ कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल केला आहे.
मुंबई लोकल
एकूण दंडापैकी ४१.२६ कोटी रुपये केवळ मुंबई उपनगरीय विभागातून वसूल करण्यात आले आहेत.
एसी लोकल
एसी लोकलमध्ये अनधिकृत प्रवास करणाऱ्या ९१,००० प्रवाशांकडून २.९७ कोटी रुपये दंड आकारण्यात आला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत ९७% जास्त आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वेवर प्रवाशांचा प्रवास खडतर होणार आहे. मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या विस्तारीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या प्रकल्पाच्या तांत्रिक कामांसाठी २१ डिसेंबर २०२५ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत मोठ्या ब्लॉकची घोषणा आधीच करण्यात आली असून, आज रात्री होणारे काम याच व्यापक नियोजनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
सध्या मुंबई लोकलची दैनंदिन प्रवासीसंख्या सुमारे ७५ ते ८० लाखांच्या घरात आहे, ज्यापैकी एकट्या पश्चिम रेल्वेवर ३५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. २१५ लोकल फेऱ्या रद्द झाल्यामुळे या लाखो प्रवाशांवर प्रचंड ताण येणार आहे. विशेषतः ऐन कामाच्या वेळी होणारी गर्दी आणि फेऱ्यांमधील विलंबाने मुंबईकरांचे हाल होणार आहेत. रेल्वेच्या या पायाभूत सुविधांमुळे भविष्यात प्रवासाचा वेळ कमी होणार असला, तरी सध्या मात्र प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.












Click it and Unblock the Notifications