Mumbai Train accident: डोंबिवलीत घर घ्यायला निघालेल्या IT इंजिनिअरचा करुण अंत, आईचा आधार संपला!
Mumbai local train accident : मुंबई डोंबिवली भागात आपले स्वत:चे घर असावे, म्हणून अहोरात्र झटणाऱ्या युवकाच्या स्वप्नावर मात्र पाणी फिरले. त्याच्या स्वप्नाचा चुराडा झाला तर घरात असलेल्या एकमेव आईचा आधारही गेला. ही दुर्दैवी घटना घडली ती मुंबईत झालेल्या रेल्वेअपघातामुळे. मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ घडलेल्या रेल्वे दुर्घटनेत 13 प्रवासी रेल्वेतून खाली कोसळले तर त्यापैकी 4 जणांना आपले प्राण गमवावे लागले.
कसाऱ्याहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी लटकून जात होते. त्याचवेळी सीएसएमटीवरुन निघालेली दुसरी लोकल प्रवाशांना घासली. यावेळी 13 प्रवासी खाली पडले आणि 4 प्रवाशांचा मृत्यू झाला.

ठाण्यातील आयटी इंजिनिअरचा तो शेवटचा प्रवास ठरला
रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या चार जणांपैकी ठाण्यातील एका 44 वर्षीय आयटी इंजिनिअरचा देखील समावेश आहे. मयूर शाह असे मृत व्यक्तीचे नाव आहे. डोंबिवलीत स्वप्नातील घर घेण्यासाठी निघालेल्या मयूरचा हात सटकला आणि दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या निधनाने स्वप्नातील घराचा चुराडा झाला तर आईचा आधारही संपला. तर या अपघाताने दोन बहीणी भावाच्या प्रेमापासून मुकल्या आहेत.
घोडबंदर भागात आईसह राहायचा मयूर!
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर शाह हा ठाण्याच्या घोडबंदर परिसरात त्याच्या आईसोबत राहायचा. त्याला दोन बहिणी असून दोघींचीही लग्ने झाली आहेत. मयूर शाह हा स्वतः अविवाहित होता. तो विद्याविहार या ठिकाणी नोकरी करायचा.
डोंबिवलीत प्लॅट खरेदीची सुरू होती प्रकिया..!
त्याची डोंबिवलीत फ्लॅट खरेदी करण्याची प्रक्रिया देखील सुरू होती. ज्याच्याकडून हा फ्लॅट खरेदी करायची होती तो मालक डोंबिवलीमध्ये राहत होता. त्यामुळे मयूर त्या व्यक्तीला भेटण्यासाठी डोंबिवलीला गेला असेल असा अंदाज त्याच्या कुटुंबियांनी लावला आहे.
या प्रकरणी मयूर शाहचा मेहूणा संतोष दोशी यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, "मयूर हा ठाण्यामध्ये त्याच्या आईसोबत राहायचा. त्याचे वडील हे 22 वर्षांपूर्वीच वारले. तो विद्याविहारला कामाला होता. त्याला डोंबिवलीत घर घ्यायचं असल्याने तो कधीकधी घराच्या मालकाला डोंबिवलीत भेटायला जायचा. आताही सकाळी तो त्यासाठीच गेला असावा आणि त्या दरम्यान हा अपघात झाला.
स्टेशनरी दुकानात काम करणारा राहुलचाही अंत
मुंब्रा इथं घडलेल्या अपघातात 44 वर्षांचे राहुल गुप्ता यांचा मृत्यू झाला. गुप्ता मुंबईतील एका स्टेशनरी दुकानात काम करायचे. आई-वडील, दोन लहान बहिणी आणि एक लहान भाऊ असा त्यांचा परिवार आहे. घरात कमावणारे ते मुख्य सदस्य होते.
आरपीएफ जवानाचा मृत्यू
रेल्वे अपघातात जीआरपीएफ जवान विकी मुख्यदल नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. विकी नाईट शिफ्ट संपवून ठाण्याहून सकाळच्या ट्रेनने कल्याणच्या दिशेने निघाला होता. जेव्हा ट्रेन क्रॉस होत होत्या त्यावेळी तोही ट्रेनमधून खाली कोसळला. त्यावेळी त्याच्यासोबत बायको आणि मुलगी होती.
लोकल अपघात- मृतांची नावे
- राहुल संतोष गुप्ता (28 ) रा. दिवा,
- सरोज केतन (23 ) रा. उल्हासनगर
- मयूर शाह (44)
- मच्छीद्र मधुकर गोतरणे, वय-31 (पोलीस कॉन्स्टेबल)
कसा झाला अपघात, ते वळण धोकादायक?
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातासाठी अनेक प्रवाशांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्थानकाजवळच्या तीव्र वळणाला जबाबदार ठरवलं. या वळणावर अप आणि डाऊन दिशेनं जाणाऱ्या लोकल किंवा इतर ट्रेनमधलं अंतर कमी होतं. या वळणासंदर्भात रेल्वे प्रशासनानं तातडीनं तोडगा काढावा अशी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.
आता याच ठिकाणी चार प्रवाशांना हकनाक आपले प्राण गमवावे लागले. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे आता तरी रेल्वे प्रशासन मुंब्रा स्थानकाजवळच्या धोकादायक वळणाची दखल घेत त्यावर काही तोडगा काढणार का हे पाहावं लागेल.












Click it and Unblock the Notifications