मोंथा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात संकट! यलो अलर्ट; 'या' भागात पडणार मुसळधार पाऊस, IMD चा इशारा
Montha cyclone update maharashtra imd yellow alert : बंगालच्या उपसागरात घोंघावणाऱ्या 'मोंथा' (Cyclone Montha) या तीव्र चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचे संकट उभे राहिले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ आज (मंगळवार, २८ ऑक्टोबर) अधिक तीव्र होऊन संध्याकाळपर्यंत आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकणार असले तरी, मीडिया रिपोर्टनुसार, त्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होणार आहे.

मोंथा चक्रीवादळाची सद्यस्थिती
सध्याची स्थिती: 'मोंथा' हे चक्रीवादळ सध्या बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पश्चिम आणि लगतच्या पश्चिम-मध्य भागावर आहे. हे चक्रीवादळ आज, २८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळ किंवा रात्री आंध्र प्रदेशातील काकीनाडाजवळ आणि कलिंगपट्टणमदरम्यान किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.
वाऱ्याचा वेग किती असेल?
लँडफॉलच्या वेळी वाऱ्याचा कमाल वेग ९० ते १०० किमी प्रतितास असून, तो ११० किमी प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 'मोंथा' मुळे आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तामिळनाडूमध्ये अतिवृष्टीचा 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रावर 'मोंथा' चा किती प्रभाव?
मोंथा चक्रीवादळाचा थेट धोका आंध्र प्रदेश किनारपट्टीला असला तरी, त्याच्या प्रभावामुळे आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात दुहेरी हवामान संकट निर्माण झाले आहे, तूर्त नको असलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात यलो अलर्ट
प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरनुसार, 'मोंथा' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील विदर्भ विभागाला जास्त फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे.
पावसाची स्थिती कशी राहील? (२८ ते ३० ऑक्टोबर)
चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशीम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दरम्यान या भागांमध्ये ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रावर 'मोंथा' चक्रीवादळाचा परिणाम! IMD चा इशारा: 'या' भागात आज पावसाची शक्यता..
कोकण आणि मध्य महाराष्ट्र
- बंगालच्या उपसागरातील 'मोंथा' आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा यांच्या संयुक्त प्रभावामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
- मच्छिमारांना इशारा: अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीवरील सर्व मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट सल्ला देण्यात आला आहे.
- शेतकऱ्यांचे नुकसान: ऐन काढणीच्या वेळी पुन्हा पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
- प्रशासन सज्ज: आंध्र प्रदेश सरकारने किनारी भागातून लोकांचे स्थलांतर सुरू केले आहे, तर महाराष्ट्रातील 'यल्लो अलर्ट' असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.












Click it and Unblock the Notifications