मान्सूनबाबत हवामान विभागाकडून धक्कादायक अंदाज; शेतकऱ्यांची चिंता वाढली
यंदा देशात आणि राज्यात मान्सून लवकर दाखल झाला होता. महाराष्ट्रात साधारणपणे ७ जूनच्या आसपास मान्सून येतो, पण यंदा २५ मे रोजीच मान्सूनने राज्यात प्रवेश केला. सुरुवातीला मान्सूनच्या आगमनासोबतच मुसळधार पाऊस झाला आणि अनेक भागांत जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. मात्र, ३० मे नंतर पावसाने काहीसा खंड घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली, पण २० जूनच्या सुमारास पुन्हा पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

या ओढीनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने पेरण्यांच्या कामाला गती मिळाली. असे असले तरी, अजूनही अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण असमान आहे. विशेषतः मराठवाड्यात अद्याप म्हणावा तसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यातच, हवामान विभागाच्या नव्या अंदाजाने ही चिंता अधिकच वाढवली आहे.
हवामान विभागाचा नवा अंदाज काय सांगतो?
हवामान तज्ज्ञ एसडी सानप यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे आणि सध्या तरी मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्यासाठी अनुकूल वातावरण नाही. तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात पुढील दोन-तीन दिवसांत मोठा पाऊस अपेक्षित नाही, मात्र २० जुलै नंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पण अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही, ज्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. सध्या तरी मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल स्थिती नसल्याचा हवामान विभागाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसात खंड पडल्याने पिके सुकू लागली आहेत. जर वेळेवर पाऊस पडला नाही, तर दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते.












Click it and Unblock the Notifications