मान्सूनच्या हालचालींना वेग!, महाराष्ट्रात काही भागांमध्ये 'या' भागांत ऑरेंज अलर्ट
यावर्षी नैऋत्य मान्सून अपेक्षेपेक्षा वेगाने सरकत आहे आणि आगामी काही दिवसांत तो केरळमध्ये दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. येत्या चार दिवसांत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर पोहोचेल, असा सुधारित अंदाज आता देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, नैऋत्य आणि ईशान्यकडे मान्सून वेगाने प्रगती करत असून, लवकरच केरळसह तमिळनाडू, लक्षद्वीप, बंगालच्या उपसागराचा दक्षिण व मध्य भाग आणि ईशान्य भारतातही मान्सून दाखल होईल.
अरबी समुद्रातील स्थिती महत्त्वाची
मान्सूनच्या प्रवासावर अरबी समुद्रात तयार होणाऱ्या हवामान प्रणालींचा मोठा प्रभाव असतो. सध्या समुद्रात एक चक्रीय प्रणाली निर्माण होत असून, तिच्या प्रभावामुळे गुरुवारी कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. यामुळे वातावरणातील आर्द्रतेमध्ये वाढ होऊन, पावसाचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या प्रमुख शुभांगी भुते यांच्या म्हणण्यानुसार, या प्रणालीचा प्रभाव महाराष्ट्रात स्पष्टपणे जाणवेल.
कोणत्या भागांमध्ये अलर्ट?
मान्सूनच्या आगमनापूर्वीच पावसाने महाराष्ट्रात हजेरी लावायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर काही भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अलर्टनुसार, पुढील काही दिवसांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.
ऑरेंज अलर्ट असलेले भाग:
पुणे घाट परिसर: गुरुवार आणि शुक्रवार
अहिल्यानगर: बुधवार
बुधवार : कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव
कोल्हापूर, सातारा घाट क्षेत्र: बुधवार आणि गुरुवार
रत्नागिरी: बुधवार ते शुक्रवार
सिंधुदुर्ग: बुधवार, गुरुवार आणि शनिवार
रायगड: गुरुवार
शेतीचेही मोठे नुकसान
मे महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत अंदाजे ४०० ते ४५० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून, सुमारे ७०० ते ८०० शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.
मुख्यतः फळबागा, भाजीपाला, चारा पिके आणि रब्बी हंगामातील शेतीवर या पावसाचा परिणाम झाला आहे. शिवाय अजूनही जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी चालूच असल्याने नुकसानात वाढ होत आहे. कृषी विभागाने पंचनाम्याचे काम सुरू केले असून, ही आकडेवारी अंतिम नाही.
मान्सूनकडे साऱ्यांचे लक्ष
मान्सूनचे केरळमध्ये आगमन हे संपूर्ण देशासाठी एक महत्त्वाचा टप्पा असतो. यंदाचा मान्सून वेगाने पुढे सरकत असल्याने महाराष्ट्रातील नागरिक, शेतकरी आणि प्रशासन यांचे लक्ष पुढील काही दिवसांत होणाऱ्या बदलांकडे लागले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आपत्कालीन यंत्रणांना सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जलसंचय, नालेसफाई, वाहतूक व्यवस्थापन यांसारख्या बाबींवरही लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications