संघाने सांगितले तर लगेच राजीनामा देईन; सरसंघचालक भागवतांनी स्पष्टच सांगितलं! सावरकरांवरही मोठं विधान
Mohan Bhagwat on Sarsanghchalak post : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षाच्या निमित्ताने मुंबईत आयोजित व्याख्यानमालेत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विविध विषयांवर आपली रोखठोक भूमिका मांडली. पदाचा राजीनामा, सरसंघचालक पदाची पात्रता आणि वीर सावरकर यांना भारतरत्न यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी केलेल्या विधानांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

पदाचा मोह नाही : "संघाची विनंती अन् माझा राजीनामा"
संघात साधारणपणे वयाच्या ७५ व्या वर्षानंतर सक्रिय पद न भूषवण्याची एक अलिखित परंपरा मानली जाते. याच पार्श्वभूमीवर बोलताना भागवत म्हणाले, "जर संघाने मला विनंती केली किंवा तसे करण्यास सांगितले, तर मी तत्काळ माझ्या पदाचा राजीनामा देईन." संघात कोणालाही निवृत्त होण्यासाठी सक्ती करावी लागत नाही, कारण स्वयंसेवक शेवटच्या श्वासापर्यंत कार्यासाठी समर्पित असतो, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
सरसंघचालक कोण होऊ शकतो?
जातीव्यवस्थेवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, सरसंघचालक पदासाठी विशिष्ट जात ही पात्रता नाही. "क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा ब्राह्मण असणे ही सरसंघचालक होण्याची पात्रता नाही. जो हिंदू संघटनेसाठी निष्ठेने काम करतो, असा कोणताही हिंदू या पदाची जबाबदारी सांभाळू शकतो."
सावरकर आणि भारतरत्न
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना भागवत म्हणाले की, सावरकरांना 'भारतरत्न' प्रदान केल्याने केवळ त्यांचा सन्मान होणार नाही, तर या सर्वोच्च नागरी पुरस्काराची प्रतिष्ठा अधिक वाढेल.
भागवतांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे!
१. समान नागरी संहिता (UCC): युसीसी लागू करताना समाजातील सर्व घटकांचा विश्वास संपादन करणे आवश्यक आहे. यामुळे समाजात दुफळी किंवा मतभेद निर्माण होऊ नयेत, याची काळजी घेतली पाहिजे.
२. भारत-अमेरिका व्यापार करार : कोणताही आंतरराष्ट्रीय करार करताना भारताचे हित सर्वोच्च राहिले पाहिजे. हा व्यापार करार देशाच्या हिताचाच असेल आणि त्यातून भारताचे नुकसान होणार नाही, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
३. घुसखोरीचा प्रश्न : घुसखोरांची ओळख पटवणे आणि त्यांना हद्दपार करणे या प्रक्रियेवर सरकार काम करत आहे. पूर्वी याकडे दुर्लक्ष होत होते, पण आता ही प्रक्रिया सुरू झाली असून ती अधिक गतीने पुढे नेणे गरजेचे आहे.
४. प्रसिद्धी आणि अहंकार : संघाचे कार्य केवळ प्रसिद्धी मिळवणे नाही, तर समाजात मूल्यांची रुजवण करणे आहे. "प्रसिद्धी ही पावसासारखी असावी - योग्य वेळी आणि मर्यादित. अतिप्रसिद्धीमुळे अहंकार आणि दिखाऊपणा वाढतो," असा कानमंत्र त्यांनी दिला.
५. संघाची कार्यपद्धती : संघाच्या इतिहासात कोणालाही जबरदस्तीने निवृत्त करण्याची वेळ आलेली नाही. स्वयंसेवक स्वतःहून जबाबदारी समजून कार्य करत राहतो.
६. भाषेचा अभिमान : इंग्रजी ही भारतीय भाषा नसल्याने ती संघाच्या कामकाजाची मुख्य भाषा कधीही बनणार नाही. "आपण इंग्रजी शिकले पाहिजे, पण आपली मातृभाषा विसरता कामा नये," असे त्यांनी स्पष्ट केले.












Click it and Unblock the Notifications