राज्यात सुरु असलेल्या जातीपातीच्या राजकारणावर राज ठाकरे स्पष्टचं बोलले
मुंबई : जाती आधारित आरक्षणाचा मुद्दा, त्यावरून होणारी आंदोलन आणि त्यातून महाराष्ट्रात पडत चाललेली जातीय दरी हा आज मोठा प्रश्न आहे. प्रत्येक राजकीय नेता या संदर्भात सावध भूमिका घेत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट आणि रोखठोक भूमिका घेतलीय. विकासापेक्षा जातीपातीच राजकारण करूनच अधिक मते मिळतात हे राजकारण्यांना कळून चुकलंय, असं राज ठाकरे म्हणालेत.

जातीपातीच्या राजकारणातून काहीही निष्पन्न होणार नाही
जातीपातीच्या राजकारणातून काहीही निष्पन्न होणार नाही. पुढारी जातीपातीच्या मुद्यावर मते मिळवतील. लोक भावनेच्याभरात मते देखील देतील. पण ते जनतेच्या पुढच्या पिढ्यांसाठी धोकादायक आहे, हे लक्षात घ्यायला हवं, असं राज ठाकरे म्हणाले. जातीपातीच विष शाळा कॉलेजपर्यंत पोहोचलय, असं वातावरण महाराष्ट्रात कधी नव्हत, असं राज म्हणाले.
जातीपातीच राजकारण करणाऱ्या नेत्यांना दूर ठेवण्याची वेळ आता आली आहे. कितीही आवडता पक्ष असला, व्यक्ती असली तरी जातीच राजकारण करणाऱ्यांना दूर ठेवण्याची आवश्यकता आहे. असं राजकारण करून महाराष्ट्राचं पुढे काय होणार आहे, असा सवाल राज यांनी केलाय.
महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार होईल
जातीपातीच राजकारण असंच सुरु राहील तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणि बिहार होईल. अराजक माजेल. लोक जातीवरून मारामा-या करतील. राज्यात खुनखराबे होतील, अशी भीती राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. जातीपातीच राजकारण करून मते हाताला लागतात हे राजकारण्यांना कळून चुकलंय आणि पुढेही ते तेच करणार आहेत, असं राज म्हणाले.
कचेर्यांमध्ये एकत्र काम करणारे,जेवणाचा डबा एकत्र खाणारे मित्र एकमेकांकडे जातीच्या नजरेने बघू लागलेत. हीच परिस्थिती शाळा-महाविद्यालयांमध्ये आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणांनी-तरुणींनी शांतपणे विचार करून समजून घेतलं पाहिजे आपला कशाप्रकारे खेळ होतो आहे.हे असंच चालू राहिलं तर महाराष्ट्र कधीच स्थिर होणार नाही, असा इशाराच राज यांनी दिलाय.
यादरम्यान, राज ठाकरेंना एका पत्रकाराने,"आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या विकासाच्या दुष्टीकोनातून महत्त्वाचे अनेक मुद्दे आहेत. जे मुद्दे आता हायलाइट केले जात नाही. या मुद्द्यांना घेऊन निवडणुकीत उतरण्याचं काय नियोजन असेल," असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरेंनी काही क्षण थांबून, "मला असं वाटतं मी आता युक्रेन आणि रशिया वॉरचा मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करीन," असं राज म्हणाले. या उत्तरानंतर राज स्वत: मिश्कीलपणे हसले. त्यानंतर, "महाराष्ट्रातलेच प्रश्न येणार ना हो" असं राज म्हणाले.












Click it and Unblock the Notifications