राज ठाकरेंचे 'ते' निमंत्रण भाजपने नाकारले; दोन्ही ठाकरेंची युती भाजपला रुचेना का? मुंबईत काय चाललेय?
मुंबई महापालिकेच्या धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या प्रतिसभागृहाचे आमंत्रण भारतीय जनता पक्षाने नाकारल्याचे समजत आहे. मनसेने शिवसेना उबाठा पक्षाचे नेते माजीमंत्री आदित्य ठाकरे यांना आमंत्रित दिल्याने, भाजपने ही भूमिका घेतल्याची माहिती मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 'राजकीय टाळी'ची चर्चा सुरू असतानाच, भाजपने मनसेचे निमंत्रण नाकारल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

काय आहे 'प्रतिसभागृह'?
मागील काही वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने पालिकेचे सभागृहाच भरलेले नाही. त्यामुळे लोकांच्या अनेक प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने, मनसेने महापालिकेच्या धर्तीवर प्रतिसभागृह आयोजित करण्याची घोषणा केली होती. या प्रतिसभागृहासाठी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून राज्यातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यानंतर या कार्यक्रमात कोणते नेते सहभागी होतात, याची चर्चा सुरु झाली होती.
कुणाला दिले आमंत्रण?
मनसेकडून या कार्यक्रमासाठी शिवसेना उबाठा पक्षाचे आदित्य ठाकरे, भाजपचे आशीष शेलार, समाजवादी पक्षाचे रईस शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शप पक्षाच्या राखी जाधव, मुंबई काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे आणि शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु आता हे आमंत्रण भाजपने नाकारले आहे. ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असतानाच भाजपने हे आमंत्रण नाकारल्याने पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.
कधी भरणार प्रतिसभागृह?
मुंबई मराठी पत्रकार संघात हे प्रतिसभागृह शनिवारी भरविले जाणार आहे. मात्र मनसेचे हे आमंत्रण भाजपने नाकारले आहे. भाजपचे आशीष शेलार यांच्याकडून पत्र पाठवून हे आमंत्रण नाकारले असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. मनसेकडून शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपने नाराजी दर्शवत या प्रतिसभागृह कार्यक्रमासाठी येणार नसल्याचे मनसेला कळविल्याचे सांगण्यात येते.
भाजपने आमंत्रण का नाकारले?
राज्यात एकीकडे शिवसेना उबाठा आणि मनसेच्या मनोमिलनाच्या चर्चेला उधाण आलेले असतानाच, भाजपने मनसेचे आमंत्रण नाकारल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्याशिवाय भाजपचे मंत्री आशीष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात दुरावा वाढत असल्याचेही यानिमित्ताने बोलले जात आहे. ज्या ठाकरे गटाने गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेत पराकोटाचा भ्रष्ट्राचार केला, ज्यामुळे मुंबईतील समस्यांनी आक्राळविक्राळ रुप धारण केले आहे. त्यांच्यासोबत मुंबईकरांच्या समस्यांबाबत चर्चेत सहभागी होऊन काय साध्य होणार आहे, असा सवाल भाजपने मनसेला पाठवविलेल्या पत्रात विचारला आहे.












Click it and Unblock the Notifications