Badlapur school girl rape case :"आरोपीला कठोर शिक्षा होईपर्यंत.." राज ठाकरेंचे मनसैनिकांना 'हे' आदेश
Badlapur school girl rape case : बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर येताच, राज्यात संतापाची लाट उसळली आहे. बदलापुरातील नागरिकांनी मंगळवारी सकाळी शाळेसमोर ठिय्या आंदोलन तसेच रेल्वे रोको करण्यात आंदोलन केले.
यानंतर आता अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणावरुन पोलिस आणि सरकारला धारेवर धरलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी देखील पोलिसांच्याकडून झालेल्या हलगर्जीपणावर टीका केली असून महाराष्ट्र सैनिकांनी या प्रकरणातआरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष देण्यास सांगितलं आहे.

काय आहे राज ठाकरेंची पोस्ट?
राज ठाकरेंनी आपल्या एक्स हॅंडलवर एक पोस्ट लिहिली असून त्यात म्हटले आहे की, "बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी बारा तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या ...."
जितेंद्र आव्हाडांची शक्ती विधेयकावरुन सरकारवर टीका
राष्ट्रवादी काॅंग्रेस ( शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे त्यांनी म्हटले आहे की, महिलांविरोधात घडत असलेल्या घटनांवरून जबाबदारी झटकत आपले सत्ताधारी फक्त लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप करण्यात मग्न आहेत. फक्त आपली पोळी भाजण्यासाठी प्रशासनाचा वापर केला जातोय. पण सशक्त आणि सक्षम धोरण आणून ते राबवण्याची या सरकारची कुवत नाहीये. मोठा भाऊ म्हणत आलेल्या केंद्र सरकारकडून यांनी अजून महाराष्ट्र शक्ती विधेयकही मंजूर करून घेतलं नाहीये.
जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देखील विनंती केली आहे की,. की महाराष्ट्र शक्ती विधेयकाला संमती मिळवून द्यावी, जेणेकरून महिलांविरोधातील गुन्ह्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळेल, आणि राज्यात व देशात अशा गुन्ह्यांविरोधात एक उदाहारण सादर होईल.
काय आहे प्रकरण?
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत एका सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केला आहे. हे प्रकरण सात दिवसांनी समोर आले आहे. चिमुकल्यांच्या पालकांनी याबाबत पोलिसांनी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवले. सोमवारी शाळेने माफीनामा जाहीर केला याप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेसह चौघांना निलंबीत करण्यात आले.
मंगळवारी पालक आणि सजग नागरिकांनी शाळेविरुद्ध आंदोलनाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी पालक आणि बदलापुरकर शाळेच्या बाहेर जमले आणि आंदोलनाला सुरुवात झाली. यात हजारो बदलापूरकर सामिल झाले. आंदोलकांनी रेल्वे रोको केल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करावा लागला.












Click it and Unblock the Notifications