मोठी बातमी..! उत्तम जानकर दिल्लीला जावून देणार आमदारकीचा राजीनामा; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर
गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने नेत्रदीपक यश मिळवलं. मात्र या यशानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील आंदोलन तर राज्यभर गाजलं होतं. हा मुद्दा अजूनही शांत झालेला नाही. याच मुद्यावर शरद पवार गटाचे आ. उत्तम जानकर व माजी आ. बच्चू कडू थेट दिल्लीला जाणार आहे. तेथेच उत्तम जानकर हे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले जात आहे.

नेमका काय आहे विषय?
गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार यश मिळालं. मात्र विरोधकांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करत, बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली होती. मारकडवाडीत आंदोलनही केलं होतं. मात्र यावर समाधानकारक उत्तर न आल्याने, आता आ. उत्तम जानकर व माजीमंत्री बच्चू कडू हे २३ जानेवारीला मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घ्यायला थेट दिल्लीला जाणार आहेत. तेथेच उत्तम जानकर हे राजीनामा देणार आहेत.
दिल्लीत कशाला जाणार?
माळशिरस तालुक्यातील धानोरे व मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, असे प्रतिज्ञापत्र तयार केले आहे. निवडणूक आयोगाच्या नावाने असणारी ही प्रतिज्ञापत्र घेऊन आ. जानकर व बच्चू कडू दिल्लीला जाणार आहेत. धानोरे या गावात हात वर करुन मतदान घेण्यात आले. तेव्हा जानकर यांना १२०६ मते मिळाली. वास्तविक, प्रत्यक्ष मतदानावेळी त्यांना या गावातून फक्त ९६३ मते मिळाली होती. हा २४३ मतांचा फरक आ. जानकर निवडणूक आयुक्तांसमोर मांडणार आहेत.
राजीनाम्यावर ठाम
आ. जानकर हे २३ जानेवारीला मुख्य निवडणूक आयुक्तांकडे राजीनामा देणार आहेत.त्यानंतर त्यांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर केली नाही तर, २५ जानेवारीला ते दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणार आहेत. आपण राजीनामा व आंदोलनावर ठाम असल्याचे जानकर यांनी प्रसारमाध्यमांना आज सांगितले. जानकर यांच्या या पवित्र्यामुळे ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येणाऱ असल्याचे दिसत आहे. शरद पवारांचा आमदार थेट राजीनामा देणार असल्याने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.












Click it and Unblock the Notifications