वाल्मिक कराडला अटक करा अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल, आ. संदीप क्षीरसागर आक्रमक
Santosh Deshmukh murder case : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन चांगलच वातावरण तापलं आहे. बीडचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर सभागृहात चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करा अन्यथा अधिवेशन संपल्यानंंतर बीड जिल्ह्यातील जनता रस्त्यावर उतरेल , असा इशारा आमदार क्षीरसागर यांनी दिला आहे.
पुढे बोलताना आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की, संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर एक पहिला आमदार म्हणून मी त्यांच्या मस्साजोग गावात गेलो होतो. त्यावेळी गावातील लोकांनी मला नावासहित सांगत होते, त्या लोकांच्या सांगण्याप्रमाणे मी नावे घेतली. आणि त्या माणसाचं नाव वाल्मिक कराड आहे, असं क्षीरसागर म्हणाले. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही पोलीस ठाणे जाळून टाकू, असं मस्साजोगचे गावकरी म्हणत होते. मात्र, मी त्यांना थांबवले. वाल्मिक कराडला अटक झाली नाही, तर अधिवेशन संपल्यानंतर जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण होईल असा इशारा ही क्षीरसागर यांनी दिला आहे.

आमच्या जिल्ह्यात 307 चा गुन्हा चॉकलेट खाल्ल्यासारखा दाखल होतो
"आमच्या जिल्ह्यात 307 चा गुन्हा चॉकलेट खाल्ल्यासारखा दाखल होतो. आमच्या जिल्ह्यातल्या पाटोद्याचं एक कुटुंब आहे, रामकृष्ण बांगर म्हणून, त्यांच्या कुटुंबाच्या विषयात अतिशय घाणेरडा प्रकार झाला आहे. त्यांच्या मुलावरती आपण समजू शकतो त्याने काही तरी केलं म्हणून 307 आपण दाखल केला. त्याचे आई-वडिल, मुलगा यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. अजून तिसऱ्यांदा त्या कुटुंबावर आई-वडिल आणि मुलगा यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल केला. असं काय केल होतं त्यांनी, जिल्ह्यात कुणावर काय गुन्हा दाखल होईल, कोण कधी काय करलं याचा भरवसा नाही" असं संदीप क्षीरसागर सभागृहात म्हणाले.
सरकारने ही परिस्थिती बदलण्यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत. मी जातीचा जो बोललो, आता आमच्या जिल्ह्यात अशी परिस्थिती झाली की, बीड जिल्ह्यात मराठा आणि वंजारी हे दोन मोठे समजात आहेत. पण आज जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे की, दुकानदारांकडून साधी वस्तू विकत घेताना जात पाहिली जाते. एखादा अधिकारी जिल्ह्यात आला तर त्याच्या नावापेक्षा आडनाव काय ते पाहिले जाते. आमचा जिल्हा पुरोगामी जिल्हा आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा राहिला आहे. हे जाती-पातीचं राजकारण भोवलं जातं,माझं उदाहरण देयचं झालं तर माझ्या जातीच लोक जिल्ह्यात सुईच्या टोकावर मोजण्याइतके आहेत. तरीही बीडच्या जनतेने मला दुसऱ्यांदा आमदार होण्याची संधी दिली आहे, असेही संदीप क्षीरसागर यांनी म्हटले.
6, 9 आणि 11 डिसेंबरचे कॉल रेकॉर्ड तपासले पूर्ण गणित लक्षात येईल
एखाद्या शाळेत मराठा समाजाची जास्त मुलं असतील तर वंजारी विद्यार्थ्याचे पालक त्या शाळेतून आपल्या मुलाचे अॅडमिशन काढून घेत आहेत, अशी सध्याची परिस्थिती आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर 6 डिसेंबर, 9 डिसेंबर आणि 11 डिसेंबर या तीन दिवसांचे वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड पोलिसांनी तपासले तर पूर्ण गणित लक्षात येईल, असं क्षीरसागर यांनी सांगितले.
विंड मिलमध्ये भांडण झाली. 6 तारखेला विंड मिलमध्ये भांडणं झाली. विंड मिल रॅकेटमुळे हा प्रकार सुरु झाला. 6 डिसेंबरला भांडणानंतर संतोष देशमुख आणि तिकडचा वॉचमन आणि विंडमिलचा अधिकारी शिंदे म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेले होते. मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही, केवळ एनसी दाखल करुन घेतली. त्यानंतर 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली.
जेव्हा संतोष देशमुखला दोन गाड्या अडवून उचललं घेऊन गेले, तेव्हा त्यांच्यासोबत एक त्याचा सहकारी सोबत होता. तो पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने सरपंचांचा जीव धोक्यात असल्याचे पोलिसांना सांगितले. तेव्हा पोलिसांनी कोणतेही तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यानंतर दोन-तीन तासांनी संतोष देशमुख यांचा मर्डर केल्यावर पोलीस कामाला लागले, असा गंभीर आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला आहे.












Click it and Unblock the Notifications