अं हं रिस्क नाहीच ! भाजपला नडणाऱ्या शिंदेंच्या आमदाराने घेतला 'हा' मोठा निर्णय
जळगाव जिल्ह्यासह राज्यातील नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये अतिशय चुरस पाहायला मिळाली आहे. मात्र, मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतरही मतमोजणीची तारीख पुढे ढकलल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अचानक झालेल्या या बदलामुळे सर्वचं नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, यामागे भाजपचे 'सोयीचे राजकारण' असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

शिवसेनेची मोठी भूमिका; पाचोरा-भडगावात खासगी सुरक्षा गार्ड
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, ईव्हीएम (EVM) यंत्रांच्या सुरक्षिततेबाबत महाविकास आघाडीने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी थेट भाजपवर विश्वास नसल्याचे दर्शवत मतमोजणी होईपर्यंत ईव्हीएम यंत्रांवर खासगी सुरक्षा रक्षक नेमण्याची तयारी केली आहे.
सर्वात महत्त्वाचा आणि लक्ष वेधणारा भाग म्हणजे, पाचोरा आणि भडगाव या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी सक्रिय भूमिका घेतली आहे. आमदार किशोर पाटील यांच्या निर्देशानुसार, पाचोरा आणि भडगावात शिवसेनेकडून स्वखर्चाने खासगी सुरक्षा रक्षक नियुक्त केले जाणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, प्रशासनाने पोलिसांचा बंदोबस्त ठेवला असला तरी, संभाव्य धोका टाळण्यासाठी ईव्हीएम यंत्रांवर 'डोळ्यात तेल घालून' नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासोबतच, ईव्हीएम ठेवलेल्या जागेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी देखील केली जाणार आहे. पाचोरा आणि भडगावात शिवसेना आणि भाजपमध्ये थेट आणि अत्यंत चुरशीचा सामना झाल्याने ही खबरदारी घेतली जात आहे.
'ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता' - माजी खासदार उन्मेश पाटील
मतमोजणी लांबणीवर टाकण्याच्या या निर्णयावर माजी खासदार आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते उन्मेश पाटील यांनीही गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यांनी थेट सरकार आणि राज्य निवडणूक आयोगावर निशाणा साधत निवडणुकीच्या पारदर्शकतेवर शंका व्यक्त केली आहे.
पाटील यांनी म्हटले आहे की, मतमोजणी लांबवल्यामुळे निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात येत आहे आणि या मधल्या काळात ईव्हीएम यंत्रांमध्ये छेडछाड होण्याची किंवा ती हॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.
इतरत्रही खासगी सुरक्षेची मागणी
शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाव्यतिरिक्त, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनीही चाळीसगाव शहरात ईव्हीएमवर लक्ष ठेवण्यासाठी खासगी सुरक्षा रक्षक नेमण्याची आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी केली आहे. चाळीसगावात शहर विकास आघाडीकडून ही मागणी केली जाणार आहे.
या सर्व घडामोडींमुळे निकाल लांबणीवर पडणे हे भाजपचे सोयीस्कर राजकारण असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप अधिक तीव्र झाला आहे. उमेदवार आणि मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, पुढील काही दिवस निवडणूक प्रक्रियेवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे नाट्य रंगण्याची चिन्हे आहेत.












Click it and Unblock the Notifications