संजय राऊतांनी वायफळ बडबड बंद करावी, अन्यथा त्यांना वेगळ्या..!, शिंदेंच्या 'या' शिलेदाराने दिला इशारा
Arjun Khotkar vs Sanjay Raut : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यावरून सुरू झालेल्या चर्चांना शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गट यांच्यातील शाब्दिक युद्धामुळे आणखी धार आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून गंभीर आरोप करत मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यासही तयार असल्याचा दावा केला होता. यावर आता शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी राऊतांना थेट इशारा दिला आहे.
शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामागे नेमकं काय?
गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विरोधकांनी या दौऱ्यामागचं नेमकं कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला होता. याच दरम्यान, संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणेच आपल्या खास शैलीत या दौऱ्यावर भाष्य करत काही खळबळजनक दावे केले. राऊत यांच्या म्हणण्यानुसार, शिंदे गुरुपौर्णिमेनिमित्त दिल्लीला गेले होते आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना 'गुरू' मानून त्यांची पूजा केली.

राऊत यांनी पुढे असाही दावा केला की, याच दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी नाराजी व्यक्त करत त्यांची अमित शाह यांच्याकडे तक्रार केली. फडणवीस आपल्याला आणि आपल्या आमदारांना काम करू देत नाहीत, कोंडी करत आहेत आणि अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी तक्रार शिंदेंनी शाह यांच्याकडे केल्याचं राऊत म्हणाले होते. एवढंच नाही, तर मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यासही तयार आहेत, असा सनसनाटी दावाही त्यांनी केला होता.
खोतकरांचा राऊतांना 'दम'
संजय राऊत यांच्या या दाव्यांवर शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली असून, आमदार अर्जुन खोतकर यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. खोतकर म्हणाले की, "संजय राऊत यांना एकनाथ शिंदे हे कळलेलेच नाहीत. संजय राऊत यांना कोणी विसर्जित केले? एकनाथ शिंदेंनी तुम्हाला विसर्जित केले आहे. तुमच्या सगळ्यांची वाट लावलेली आहे. त्यामुळे ते असे बोलणार नाही तर काय बोलणार?"
खोतकर इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी राऊतांना थेट इशारा दिला. "संजय राऊत यांनी आता वायफळ बडबड बंद करावी. नाहीतर त्यांना वेगळ्या पद्धतीने तोंड द्यावे लागेल," असे ते म्हणाले. त्यांनी राऊतांना हे देखील लक्षात ठेवण्यास सांगितले की, "आज संजय राऊत खासदार आहेत ते फक्त एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आहेत. आमच्या उपकारांची परतफेड अशी नसते. खोतकरांच्या या इशाऱ्यामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. या शाब्दिक युद्धाचे रूपांतर कोणत्या स्वरूपात होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications