मंत्री माणिकराव कोकाटे राजीनामा देणार? आमदारकी धोक्यात? वाचा नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोन वर्षांनी शिक्षा सुनावली आहे. तीस वर्षांपूर्वीच्या म्हणजेच 1995 सालच्या एका प्रकरणात ही शिक्षा झाली आहे. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक प्रकरणात कोकाटेंवर आरोप करण्यात आले होता. याच प्रकरणात न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आता ही शिक्षा झाल्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक प्रकरणाचा आरोप मंत्री माणिकराव कोकाटेंवर होता. हे प्रकरण 1995 सालचे आहे. कोर्टाने थेट ३० वर्षांनंतर निकाल दिला. कोर्टाने मंत्री कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनाही शिक्षेस ग्राह्य धरले. दोन वर्षांची शिक्षा व ५० हजारांचा दंड ठोठवण्यात आला आहे. हा मंत्री कोकाटे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात असून, ते आता या प्रकरणात वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार आहेत.
मंत्री कोकाटे काय म्हणाले?
कोर्टाच्या या निकालानंतर मंत्री कोकाटे यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, ट्रायल झाल्यानंतर निकाल लागतो. मला न्याय मागण्याचा अधिकार त्यामुळे मी आता वरच्या कोर्टात आपील करणार आहे. हा खटला 1995 चा आहे. पण न्याय प्रणालीनुसार त्याचा निकाल आज लागला. त्यामुळे त्याला जरी उशिर झाला. आता मी वरच्या कोर्टात आपील करणार आहेत. ही न्यायालयीन बाब असल्यामुळे मी या संदर्भात जास्त भाष्य करणार नाही. आता माझ्या राजीनाम्याची देखील मागणी होऊ शकते, अशी प्रतिक्रिया कोकाटे यांनी दिली.
काय होऊ शकते?
न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. नाशिक जिल्हा कनिष्ठ न्यायालयात त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर सुनावणी सुरू असून, थोड्याच वेळात जामिनाबाबत निर्णय होणार आहे. माणिकराव कोकाटे यांना जामिन मिळणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यास महायुती सरकार काय निर्णय घेईल, याकडे आता लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications