बीडमध्ये 'काळा आक्रोश'; हजारोंचा हत्येच्या निषेधासाठी मोर्चा, अनेक नेत्यांनी व्यक्त केल्या भावना
मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षियांनी मोर्चा काढला. काळ्या फिती बांधून व काळे झेंडे हातात घेऊन हा काळा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. वाल्मिक कराडला अटक करा, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या... आदी घोषणांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले. यावेळी सर्वपक्षिय नेत्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

हजारोंचा जनसमुदाय
बीडमध्ये आज काळा आक्रोश उसळला. सर्वपक्षीय, सर्व धर्मीय या मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा दाखल झाला आहे. काळ्या फिती लावून, काळे झेंडे हातात घेऊन हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले आहेत. सर्वत्र काळे कपडे घातलेले आणि काळे झेंडे घेतलेले लोक दिसत आहेत. या काळ्या आक्रोशात महिला, ज्येष्ठ नागरीक, तरुण मोठ्या संख्येने हजर झाले आहेत. या मोर्चातून एकच मागणी करण्यात येत आहे, ती म्हणजे वाल्मिकी कराडला अटक करा. धनंजय मुंडे राजीनामा द्या...
घोषणांनी परिसर दुमदुमला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकाळी या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, आ. सुरेश धस, आ. संदीप क्षीरसागर, खा. बजरंग सोनावणे, आ. प्रकाश सोळंके, मनोज जरांगे, ज्योती मेटे, आ. जितेंद्र आव्हाड हे नेते सहभागी झाले आहेत. या मोर्चात हजारो महिला आणि पुरुष सामील झाले आहेत. या मूक मोर्चात सर्वच पक्षाचे लोक आले आहेत. प्रत्येकाच्या हातात काळे झेंडे आहेत. प्रत्येकाच्या हातात फलक आहे. संतोष देशमुखला न्याय द्या, संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना अटक करा, असं या फलकवर लिहिलेलं होतं.
सर्व नेत्यांच्या भावना तीव्र
या मोर्चाचं रुपांतर सभेत झालं आहे. प्रत्येक नेत्याने आक्रमकपणे आपले मुद्दे मांडत आहेत. प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे, वाल्मिकी कराड यांना अटक करा. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे सुद्धा मोर्चात सहभागी झाले आहेत. वाल्मिकी कराड हा नरभक्षक आहे. तो महाराष्ट्रातील रमन राघव आहे. या नराधमाला ठेचलं पाहिजे. माझा आंदोलकांना पाठिंबा आहे. कारण ही माणुसकीची लढाई आहे. ही कोण्या पक्षाची लढाई नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.












Click it and Unblock the Notifications