बिग न्यूज : मराठा आरक्षणावर सुनावणी 3 आठवडे लांबणीवर! हायकोर्टात काय झाले घ्या जाणून
मुंबई : मराठा आरक्षण प्रकरणाची उच्च न्यायालयातील सुनावणी 3 आठवडे लांबणीवर गेली असून आता या प्रकरणी येत्या पाच ऑगस्टला सुनावणी होणार आहे.
आयोगाला 3 आठवड्याची मुदत
महायुती सरकारने मराठा समाजाला दिलेल्या 10 टक्के आरक्षणप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर सरकारच्या वतीने राज्य मागास आयोगाकडून बाजू मांडण्यात येत आहे. मात्र, आयोगाने मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली होती. त्यावर, उच्च न्यायालयाने तीन आठवड्यांची मुदतवाढ आयोगाला दिली.

कोर्टाचे याचिकाकर्ते, राज्य सरकारला निर्देश
महाराष्ट्रातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय श्रेणीतील मराठा समाजाच्या नोकऱ्या अन् शिक्षणातील 10 टक्के कोट्याच्या आव्हानावर मुंबई उच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी पार पडली. मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सध्या न्यायालयात सुनावणी चालू आहे. त्यावर, आज न्यायालयाने याचिकाकर्ते व राज्य सरकार यांना महत्त्वाचे निर्देश दिले असून पुढील सुनावणी ऑगस्ट महिन्यापर्यंत तहकूब केली आहे.
आज काय झाले न्यायालयात
मराठा आरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मागास आयोगाला आणखी मुदतवाढ हवी आहे. आयोगाचे वकील सध्या परदेशात आहेत. त्यामुळे आयोगाच्या वतीने हायकोर्टाकडे याबाबत विनंती करण्यात आली होती. त्यानंतर, तीन आठवड्यांत राज्य मागासवर्ग आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे, पुढील तीन आठवड्यापर्यंत राज्य मागासवर्गीय आयोगाला मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे, आता, 5 ऑगस्टपासून पुढील नियमित सुनावणी सुरू होणार आहे.
आयोगाने मांडलेल्या भूमिकेवरील प्रतिज्ञापत्रावर इतर सर्व प्रतिवाद्यांना 10 दिवसांत उत्तर देण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे, आता ऑगस्टपर्यंत न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वादी व प्रतिवादींना म्हणणे मांडण्यास अवधी दिला आहे. त्यानंतर, न्यायालयाची नियमित सुनावणी सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
जरांगे म्हणाले ओबीसीतूनच आरक्षण हवे
मराठा समाजाला आरक्षणासोबत सगेसोयरेसंदर्भातील मुद्दा चांगलाच गाजत आहे. मराठा समाजाला टिकाणारे आरक्षण हवे अशी मागणी मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची आहे. त्याचसाठी उपोषणास्त्रानंतर आता मनोज जरांगे पाटील मराठवाड्यात शांतता रॅली काढत आहेत. एकीकडे राज्यात मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपली लढाई चालूच ठेवली आहे.
या शांतता रॅलीद्वारे ते मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. नांदेडच्या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी सरकाकडे केली आहे. त्यामुळे आता कायदेशीरमार्गाने ही लढाई सुरु असून येत्या पाच ऑगस्टनंतर या प्रकरणी सुनावणी होणार आहे.












Click it and Unblock the Notifications