आरोपींना मोक्का लावल्यानंतर मनोज जरांगेंची दुसरी मागणी; धनंजय मुंडेंबाबत मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आठ आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. एसआयटीने ही कारवाई केली. आता या सर्व आरोपींवरील खटला विशेष न्यायालयात चालणार आहे. शिवाय आरोपींना जामीनही मिळणार नाही. मात्र असे असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे दुसरी मागणी केली आहे. जरांगे यांची ही मागणीही सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

कारवाईचे केले स्वागत
मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आठ आरोपींना मोक्का लावल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या प्रकरणात आता खुनाच्या गुन्ह्यात सहभाग आढळला तर वाल्मिक कराड याच्यावही याच कायद्याअंतर्गत कारवाई होणार आहे. याबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी देशमुख कुटुंबाला शब्द दिला होता. तो आता ते पाळत असल्याचे दिसतेय. मोक्का लावणार असं ते म्हणाले होते, तेच ते करताहेत, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारवाईचे स्वागत केले.
धनंजय मुंडेबाबत मागणी
जरांगे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी कुणालाही सोडणार नाही, असा शब्द दिला आहे. त्यामुळेच मराठा शांत आहे. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांनी राज्यात पसरविलेल्या गुंडगिरीच्या नेटवर्कचा नायनाट करावा. त्यांचे लोक दरोडे टाकतात, खून करतात, खंडणी गोळा करतात, ते सर्व मुख्यमंत्र्यांनी आता पहावे. परळीपासून थेट मुंबईपर्यंतच्या त्यांच्या तक्रारी माझ्याकडे आंतरवलीत येत आहे, त्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी जरांगे यांनी केली.
सर्वांना ३०२ मध्ये टाकावे
जरांगे पुढे म्हणाले की, या प्रकरणातील जे खंडणीचे आरोपी आहेत त्यांनाही ३०२ मध्ये टाकावे. मुख्यमंत्री ते करतील, असा विश्वास आहे. राज्यात त्यांची जवळपास ४०० ते ५०० जणांची साखळी आहे. विरोधात आंदोलन करणारी संघटीत गुन्हेगारांचीच टोळी आहे. ही टोळी धनंजय मुंडेंनी पाठवली आहे. या लाभार्थी टोळीचीही मुख्यमंत्र्यांनी एकदा तपासणी करावी व त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणीही जरांगे यांनी केली.












Click it and Unblock the Notifications