'मराठ्यांचं पाणी बंद केल्यास सुट्टी नाही,' असं म्हणत नाव लिहून ठेवण्यास सांगितलं; जरागेंचा इशारा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. काल रात्रीपासून हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले असून, त्यांच्यासाठी मुलभूत सुविधांची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर, जरांगे पाटील यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्तांना थेट इशारा दिला आहे.

आंदोलकांना जेवण आणि पाण्याची व्यवस्था नसल्याचे समोर आल्यानंतर जरांगे पाटील म्हणाले, "मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आमच्या मुला-मुलींचे पाणी आणि बाथरूम बंद करण्यात आले. बीएमसीचा आयुक्त प्रशासक म्हणून काम करत आहे, पण वेळ कधी ना कधी बदलेल. निवृत्त झाल्यावरही आम्ही तुम्हाला सुट्टी देणार नाही, कारण तुम्ही मराठ्यांचे पाणी बंद केले आहे." त्यांनी आंदोलकांना बीएमसी आयुक्तांचे नाव लिहून ठेवण्यास सांगितले.
शांततेचे आवाहन आणि पोलिसांना इशारा
जरांगे यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही प्रकारची हिंसा न करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "आपल्याला हे आंदोलन शांततेत पार पाडून जिंकायचे आहे. गोंधळ घालणाऱ्यांना सांगा की आंदोलनाची दिशा सध्या शांततेत ठेवा."
याचवेळी, त्यांनी पोलिसांनाही इशारा दिला. "मी पोलिसांना सांगतो की, आमच्या पोरांना डिवचू नका. विनाकारण ताण देऊ नका," असे ते म्हणाले. त्यांनी आंदोलकांना वाहने दिलेल्या पार्किंगच्या जागी लावण्याचे आवाहन केले, जेणेकरून वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार नाही. वाशी, शिवडी आणि बीपीटी ग्राउंड येथे वाहने लावण्याचे आवाहन त्यांनी केले.
आमच्यासाठी आरक्षण महत्त्वाचे, राजकारण नाही
जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, हे आंदोलन केवळ आरक्षणासाठी आहे, राजकारणासाठी नाही. "आम्हाला राजकारण करायचे नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे आहे. पण मुख्यमंत्र्यांना राजकारणच करायचे आहे, आरक्षण द्यायचे नाही," अशी टीका त्यांनी केली.












Click it and Unblock the Notifications