छगन भुजबळ शरद पवार भेटीनंतर मनोज जरांगे भडकले, म्हणाले…
राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ सोमवारी अचानक शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. त्यामुळे राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण आले आहे. कालच भूजबळ यांनी (14 जुलै) रोजी बारामती येथून मराठा आणि ओबीसीच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
आज सोमवारी सकाळी अचानकपणे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक येथे गेले होते. दरम्यान, शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या भेटीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पवार आणि भुजबळ यांच्या भेटीनंतर मनोज जरांगेंनी भुजबळांवर कडाडून टीका केली आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?
भुजबळांवर टीका करत मनोज जरांगे म्हणाले, छगन भुजबळ ज्या ताटात खातो, त्याच ताटात थुंकणारा माणूस आहे. ज्या माणसांनी त्याला मोठं केलं, त्या सर्वांशी त्याने बेईमानी केली आहे. शरद पवारांनी ओबीसींना आरक्षण दिलं, मात्र त्याच शरद पवारांचा योग्यवेळी छगन भुजबळ यांनी कार्यक्रम वाजवला. कारण भुजबळ बेईमान माणूस आहे अशा कठोर शब्दात मनोज जरांगेंनी भुजबळांवर टीका केली.
फडणवीसांनी मंत्रीपद दिलं पण...
भुजबळांना उद्देशून जरांगे पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी त्याला मंत्रीपद दिलं, तुरुंगात जाण्यापासून वाचवलं, तरी तो मागे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल भयानक बोलला होता. त्याने नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्याला शिवसेनेने मोठे केलं, त्याने शिवसेनेचे खाल्लं आणि त्याने शिवसेनाच फोडल्याच टीकास्त्र जरांगेंनी भुजबळांवर सोडलं.
पवारांच्या भेटीवर भुजबळ काय म्हणाले
शरद पवारांना भेटल्यानंतर भुजबळ म्हणाले, ही भेट राजकीय नसून राज्यात निर्माण झालेल्या सामाजिक स्थितीमध्ये पवारांनी लक्ष घालाव, अशी विनंती करण्यासाठीच ही भेट घेतल्याचे भुजबळ म्हणाले. पवारांची आधी वेळ न घेता मी त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. प्रकृती ठीक नसल्यामुळे ते झोपले होते. मी त्यांना जाग येण्याची वाट पाहिली. जाग आल्यानंतर त्यांनी मला बोलावलं. त्यानंतर आमची चर्चा झाल्याचे भुजबळ म्हणाले.
भुजबळ पुढे म्हणाले, आपण कोणतेही राजकारण घेऊन आलेलो नाही तर या राज्याचा एक सामन्य आमदार म्हणून आलो आहे. या भेटीत माझी कोणतीही राजकीय भूमिका नाही. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनामुळे राज्यातील सामाजीक स्थिती सध्या स्फोटक झाली आहे.
लोक जात पाहूनच व्यवहार करीत आहेत. एका जातीचा माणूस दुसर्या जातीतील माणसाशी व्यवहार करीत नाही. राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे ही ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे, असे पवारांना सांगितल्याचे भुजबळ म्हणाले.












Click it and Unblock the Notifications