मध्यरात्रीपासून पुन्हा जरांगेंचे उपोषण; म्हणाले- सरकारला ही शेवटची संधी, नंतर पश्चताप होईल
Manoj Jarange Patil on Hunger Strike : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कधी आंदोलन, कधी उपोषण या मार्गाने मागण्या मांडत आहेत. त्यांना मराठा समाजातून मोठा पाठिंबाही लाभलेला आहे. मात्र, त्यांनी केलेल्या मागण्या अद्याप शासनदरबारी मान्य न झाल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार असून त्याआधी त्यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. ते सोमवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधत होते.
सरकारला संधी म्हणून हे उपोषण
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून आम्ही सरकारकडे प्रामुख्याने 10 मागण्या केल्या. त्याची तातडीने अंमलबजावणी करा. त्यात कोणतीही अडवणूक देवेंद्र फडणवीसांनी करू नये. ज्या कुणाला सत्तेची खूप मस्ती आहे, त्यांना आज स्पष्टच सांगतोय. आमच्या नावानं नंतर तक्रार करू नका. तुम्हाला आत्ताच संधी आहे. नंतर तुम्हाला पश्चताप झाल्याशिवाय राहणार नाही.

माझ्या समाजाला राजकारण करायचं नाही
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मला किंवा माझ्या समाजाला अजिबात राजकारणात उतरायचे नाही. पण आता तुम्ही निर्णय घेतला नाही, तर नंतर आमच्या नावानं आरडाओरड करायची नाही. तुम्हाला संधी म्हणून मी हे उपोषण करणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही राजकारण करू नये किंवा आमच्यामुळे कुणाचा फायदा होऊ नये तर आमच्या मागण्या मान्य करा. नाहीतर नंतर आमच्या नावानं तक्रार करायला तुम्हाला संधी राहणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे फडणवीस सरकारला दिला.
आंदोलनात फूट पाडणं, हे काही लोकांच कामच
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या आंदोलनात फूट पाडणं हे सरकारमधील काही लोकांचे कामच आहे. आजही त्यांचं षडयंत्र चालूच आहे. पण मला आजपासून त्यावर बोलायचं नाहीये. मी सरकारला पुन्हा संधी देतोय की मला आणि माझ्या समाजाला राजकारणाकडे जायचं नाहीये. आमचं ध्येय आहे मराठा आरक्षण. राज्यातला सगळा मराठा समाज कुणबी आहे. याला शेकडो पुरावे उपलब्ध आहेत. तिन्ही गॅजेट तातडीनं लागू करा. सरसकट गुन्हे मागे घेणं, बलिदान गेलेल्या कुटुंबाला सरकारी नोकऱ्या या आमच्या मागण्या आधीच त्यांना दिल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications