जरांगे पाटलांचा आरक्षणासाठी एल्गार; फडणवीसांवर प्रहार;भाजपच्या आमदार-मंत्र्याला रस्त्यावर नो एंट्री

Manoj Jarange on BJP MLAs warning : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे यांनी बीडमधील सभेतून सत्ताधारी पक्षावर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरुद्ध उभे करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप करत, जरांगे यांनी आता आरक्षणासाठीची 'शेवटची फाईट' मुंबईत घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

Manoj Jarange

सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा: रस्त्यावर फिरू न देण्याचा इशारा

मनोज जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. मुंबईतील आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनापूर्वी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. "सत्ताधाऱ्यांना मराठ्यांना मुंबईत येऊ द्यायचं नाही, त्यासाठी मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं जात आहे, पण यावेळी त्यांचा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही." "आम्ही शांत बसतो म्हणून त्याचा फायदा उचलू नका, आता मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही."

यापुढे "भाजपच्या एकाही आमदार, मंत्र्याला रस्त्यावर फिरू देऊ नका, आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही" असा निर्वाणीचा इशारा जरांगे यांनी दिला. "सरकार काय, सरकारचा बाप आडवा आला तरी आरक्षण घेणार, आणि ते पण ओबीसीतूनच घेणार," असा पण त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीसांवर सडकून प्रहार

देवेंद्र फडणवीस हे मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणं लावत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. फडणवीसांच्या 'डीएनए' आणि ओबीसी आरक्षणातील बदलांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. जरांगे म्हणाले की, फडणवीसांनी नुकतेच २९ जाती ओबीसी आरक्षणामध्ये घेतल्या, त्यांची मागणी नसतानाही त्यांना आरक्षण दिले. पण मराठ्यांची मागणी असतानाही मराठ्यांना आरक्षण दिले जात नाही. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली जात नाही, "ही पोटदुखी कशासाठी?" असा प्रश्न त्यांनी विचारला.

"देवेंद्र फडणवीस म्हणतात त्यांचा डीएनए ओबीसी आहे, मग शेतकरी ओबीसी नाही का? त्यांना कर्जमाफी करा." "आता देवेंद्र फडणवीसांनी कितीही प्रयत्न केला तरी मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण होणार नाही," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आरक्षणाचे आधार आणि मुंबई आंदोलनाची रणनीती

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मूळ मागण्या पुन्हा अधोरेखित केल्या, हैदराबाद आणि साताऱ्याच्या गॅझेट लागू कराव्या. ५८ लाख नोंदी सापडल्या असतानाही मराठ्यांना आरक्षण दिले जात नाही, त्याची अंमलबजावणी करावी.

जरांगे यांनी मराठा समाजाला शांततेत मुंबईला जाण्याचे आणि शांततेत आरक्षण घेऊन परत येण्याचे आवाहन केले. "शांततेच जायचं आणि आरक्षण घ्यायचं. सरकारने आपल्या मोर्चात काही दगडफेक करणारी माणसे पाठवली आहेत. पण आपण त्यांचा हेतू साध्य करू द्यायचा नाही." "ही शेवटची फाईट आहे, मुंबईत जायचं आणि आरक्षण घेऊन यायचं."

राजकीय नेत्यांना थेट आव्हान

बीडमधील सभेत अडचणी निर्माण केल्याबद्दल जरांगे यांनी मुख्यमंत्री आणि पोलीस प्रशासनावर टीका केली. त्यांनी मराठा समाजाच्या राजकीय नेत्यांनाही सज्जड दम दिला. "तुमच्या जातीचा आमदार, खासदार आहे म्हणून तुमच्या पोराबाळांची फी माफ होणार नाही, त्याला नोकरी मिळणार नाही." "कुणा राजकीय नेत्याचं ऐकून गावात थांबू नका. तुमच्या आमदार, खासदारांना, सरपंचापासून सगळ्या नेत्यांना मुंबईला यायला सांगा." आरक्षणासाठी आयुष्य पणाला लावले असून, "उद्या आरक्षणासाठी अंगाचं कातडं जरी फडणवीसांनी मागितलं तरी ते देणार. जातीसाठी मरण आलं तरी बेहत्तर, मी मरायला घाबरत नाही," अशी तीव्र भावना जरांगे यांनी व्यक्त केली. सत्ता येते आणि जाते, हे लक्षात ठेवा, असा इशारा देत त्यांनी "आता ही शेवटची फाईट आहे, अशी मारायची की आरक्षण घेऊनच यायचं," असा निर्धार व्यक्त केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+