एवढे छिछोरे चाळे! खुर्चीसाठी फडणवीसांना राज्य रक्तबंबाळ करायचे का? जरांगेंचा जळजळीत सवाल
मुंबई - मराठे, गोरगरीब सगेसोयऱ्यावर खोट्या केसेस करुन मराठ्यांच्या अंगावर ओबीसी नेते घालायचे. असे ना-ना प्रकार सुरु आहेत. हा देवेंद्र फडणवीसांचा वेगळा डाव आहे. मराठ्यांविरोधात सर्व जातींचे नेते विरोधात उभे करुन देवेंद्र फडणवीसांना हे राज्य रक्तबंबाळ करायचे आहे का? असा जळजळीत सवाल मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला.जालना येथे त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
एवढे छिछोरे चाळे...
मनोज जरांगे म्हणाले, एकीकडे मराठ्यांना गोड बोलून आंदोलन शांत करायचे आणि दुसरीकडे डाव टाकायचा. पण हा डाव आता उघडा पडला आहे. हे देऊ ते करू केसेस मागे घेऊ अशी भाषा वापरायची आणि दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेते मराठ्यांच्या अंगावर घालायचे. त्यांच्या बैठका लावायच्या. म्हणजे एकीकडे मराठ्यांना गोड बोलून चुचकारायचे आणि संपवायचे असे त्यांचे धोरण आहे. हा फडणवीसांचा पुन्हा एक डाव आहे.

ओबीसींच्या बैठका बोलवायच्या, त्यांना आमच्या विरोधात बोलायला लावायचे. देवेंद्र फडणवीसांचे मला एक कळत नाही की, एवढ्या मोठ्या नेत्याने इतके छिछोरे चाळे का करायला हवे?
मनोज जरांगे म्हणाले, महाविकास आघाडी-महायुतीची बैठक लावली. तेव्हापासून सर्व नेते मराठ्यांविरोधातच बोलत आहे. मराठ्यांच्या प्रश्नांवर तोडग्यासाठी बैठक लावली की, द्वेष ओकण्यासाठी हे कळत नाही. प्रकाश आंबेडकरांनी प्रत्येकवेळी सांगत होते, पण ते पण म्हणाले की, सगेसोयऱ्यांची अमलबजावणी करु नका हे धक्कादायक आहे. देवेंद्र फडणवीस सत्तेसाठी एवढ्या जातींना झुंजायला लावणार आहेत का? हा डाव वाटतोय.
मराठ्यांच्या अंगावर ते नेते पाठवतात
मनोज जरांगे म्हणाले की,फडणवीस म्हणतात की, माझ्याविरोधात नॅरेटीव्ह पसरवत आहेत पण ते वागतात तसे म्हणून आम्ही त्यांना बोलतो. प्रकाश आंबेडकरांचे जे शब्द आ्हेत तेच शब्द गरजवंत मराठ्यांच्या बाजूने राहीले नाही. आमची अपेक्षा आहे की, त्यांनी गरजवंत मराठ्यांच्या बाजूने उभे राहायला हवे. त्यांनी दलित, मुस्लिम, लिंगायत, कैकाडी समाजाच्या बाजूने उभे राहायला हवे हे वंचित आहेत, पण बैठकीला गेलेला माणूस मराठ्यांच्या विरोधात बोलतात.
ते ओबीसी-मराठ्यात भांडण लावतील
मनोज जरांगे म्हणाले, देवेंद्र फडणवीस काय करतात हे कळतच नाही. देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांच्या अंगावर ओबीसीचे नेते पाठवत आहे. तेच आम्हालाही ओबीसींच्या अंगावर घालतील. सोईनुसार ते राजकारण करतात. असे डाव देवेंद्र फडणवीस करतात पण माझी सर्व जातींना, समाजाला विनंती की, देवेंद्र फडणवीस यांच्या फासात न अडकता आपण एकत्र येऊन एकमेकांना न्याय देऊ कारण आपणच आपल्याला न्याय देऊ शकतो.












Click it and Unblock the Notifications