गिरीश महाजन माणसांना फसवतात! ते आंदोलनात फोडतात - मनोज जरागेंचा घणाघात
बीड - राज्य सरकारसोबत चार शब्दांवर बोलणी झाली. यात ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. त्यांच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र द्यायचे. पण सरकारने शब्द पाळला नाही. त्यावेळी मध्यस्त असलेले गिरीश महाजन माणसांना फसवतात हे स्पष्ट झाले. ते ज्या आंदोलनात ते गेले तेथील आंदोलन बंद पडले. ते-ते आंदोलन त्यांनी फोडले असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
धाराशीवनंतर आज मनोज जरांगे बीडमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांची रॅली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा- माळीवेस- सुभाष रोड- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (शिवतीर्थ) येथे पोहचली. यानंतर सायंकाळी जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला संबोधित केले.

आरोग्याची पर्वा नाही
मनोज जरांगे पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना सांगतो, की, आमचा मराठ्यांचा आक्रोश बीड जिल्ह्यात बघा. उन्हात आमच्या अंगाची लाहीलाही होत आहे. प्रचंड उकाडा असल्याने शरीराला त्रास होतोय पण तरीही मी मराठ्यांच्या लेकरांसाठी आरोग्याची पर्वा करीत नाही.
ओबीसी-मराठा जातीवाद नको
मनोज जरांगे पाटील म्हणाले, लोकांनी जातीवाद केला तरी मराठा समाजाने करु नये. आपल्याला महाराष्ट्रात शांतता राखायची आहे. त्यामुळे मराठ्यांनी आणि ओबीसींनी एकमेकांच्या अंगावर जायचे नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा लागू करा हे आमची सरकारला आवाहन आहे.
मनोज जरांगे म्हणाले, सरकारसोबत चार शब्दांवर बोलणी झाली. तिसरा शब्द असा होता की, ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. त्यातील नोंद न सापडलेल्या त्याच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र द्यायचे. पण हे झाले नाही. मला माहीत होते की, गिरीश महाजन माणसांना फसवतो.ते डाव टाकतील मला माहीत होते.
हे राजकारणी माणसांना त्रास देणारे
मनोज जरांगे म्हणाले, मला माहित होते की, हे अर्ध्यात गेल्यावर ते डाव टाकतील. हे राजकारणी माणसांना त्रास देणारे असतात, तुम्हीच शब्द दिला आम्ही आरक्षण दिले असे ते म्हणतील. सगेसोयरेचे आंदोलन टीकणारे नाही तर छगन भुजबळ यांना का झोप येत नाही. अंतरवालीजवळ आमच्याविरोधात त्यांनी आंदोलन बसवले. सगे-सोयऱ्यांची अंमलबजावणीबद्दल सरकार काही अडचण आणणार हे मला माहीत होते.
मराठ्यांनो गाफील राहू नका
जरांगे पाटील म्हणाले, मराठ्यांनी गाफील राहायचे नाही. सरकार कुणाचेच नसते हे मला माहीत आहे ते फक्त खुर्चीचेच बघतात, जातीचे त्यांना काही देणे-घेणे नाही. ही अमलबजावणी होणार नाही हे माझे स्वतःचे मत बनले आहे.
माझे रक्त, जीव, तुमच्यासाठी
जरांगे पाटील म्हणाले, माझे रक्त, माझा जीव, तुमच्यासाठी, मराठ्याच्या लेकरांसाठी पणाला लावू शकतो. गिरीश महाजन डाव टाकणार हे मला माहीत होते. पण मैदानात उतरताना सर्व डाव सोबत ठेवायचे हे मला माहीत आहेत. ज्या मराठ्यांची नोंद सापडेल त्या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातील जो मराठा जातप्रमाणपत्र मागेल ते सरकारने द्यावे हा माझा चौथा शब्द होता.
काहींचे दुकान बंद पडले
जरांगे पाटील म्हणाले, मायबाप समाज आरक्षणासाठी मागे हटला नाही. समाजातील काही असे होते की, लढायचे, लढायचे आणि बाजूला व्हायचे. त्यांनी लढा व्यवस्थित लढला असता तर मी हे लढा लढलोच नसतो. काहींना मी पचनी पडेना. त्यांना नोटा गोळ केल्या. समाज अशांना जवळ करेना ते अभ्यासक असूनही त्यांनी इमानदारीने पुढे गेले नाही. काहींचे दुकान बंद पडले. आंदोलन म्हटले की, ते खूश व्हायचे. पण आता त्यांची दुकान बंद पडले.
ओबीसीतून आरक्षण घेणारच
जरांगे पाटील म्हणाले, सरकारच्या बाजूने राहून जातीच्या वाटेला जाऊ नका. तुम्ही वेळोवेळे सरकारच्या सुपाऱ्या घेऊन येणार आणि म्हणणार की, आम्हाला आमची जात सुधारायची. आमची सर्वांना विनंती आहे की, आमच्या हक्काचे आरक्षण द्या. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सांगतो, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. हा माझा शब्द आहे.
सरकारने मला उघडे पाडायचे ठरवले
जरांगे पाटील म्हणाले, सरकारने मला उघडे पाडायचे ठरवले आहे. छगन भुजबळांच्या माध्यमातून सर्व ओबीसी नेते एक करुन जातीय दंगली व्हाव्या हे सरकारचे स्वप्न आहे. छगन भुजबळांना सरकारने यासाठी कामाला लावले. पण तरीही मी आरक्षण मिळवूनच शांत बसणार. मराठा समाजाला दुखवले गेले. माझा समाज शांत आहे. माझ्या मराठ्यांना जातीवादी ठरवून त्यांनी डाग लावला.












Click it and Unblock the Notifications