महेंद्र थोरवे ; पहिली टर्म गाजवली विकासकामांची गती वाढवल्याने मतदारसंघावर ठसा
Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई महानगर क्षेत्रात शिवसेनेला यश मिळाले असले तरी मुंबईला खेटून असलेल्या रायगड जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार सुरुवातीच्या काळात थोडासा धीम्या गतीने झाला. रायगड जिल्ह्यात असलेले शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व, शेकापची भक्कम बांधणी, तसेच कालांतराने सुनील तटकरे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा यात शिवसेनेची वाढ काहीशी खुंटली होती. मात्र भरतशेठ गोगावले यांच्या रूपाने महाड परिसरात शिवसेनेला उभारी मिळाली आणि नंतर अलिबाग मध्ये शिवसेनेला जनाधार मिळाला. कर्जत खालापूर या टप्प्यात मात्र शिवसेनेला आपला लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी बरीच वाट पाहावी लागली.
थोरवे यांची शिवसेनेतून सुरुवात
शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांची वाटचाल मुळात शिवसेना पक्षापासून झाली. शिवसेनेतून ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. सुरुवातीच्या काळातच त्यांनी अनेक कामे केली आणि कर्जत पट्ट्यात आपला जनाधार मजबूत केला होता. त्याच सुमारास रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढत होते.
राष्ट्रवादीच्या या वर्चस्वाला आळा घालण्यासाठी शेकापच्या नेत्यांनी महेंद्र थोरवे यांना कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली मात्र त्यांचा निसटता पराभव झाला. कालांतराने ते पुन्हा स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतले आणि 2019 साली शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात सलग दोन वेळा विजय मिळवणारे राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांचा पराभव करून महेंद्र थोरवे हे शिवसेनेचे आमदार झाले.

एकनाथ शिंदे यांना साथ
2019 मध्ये महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना भाजपा युतीला कौल दिला असला तरी उद्धव ठाकरे यांनी आयत्यावेळी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आघाडी केली आणि स्वतः मुख्यमंत्री बनले. उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय शिवसेनेचे अनेक आमदारांच्या पचनी पडला नाही. कारण स्थानिक पातळीवर हे आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संघर्ष करूनच विधिमंडळात पोहोचले होते. अशा नाराज आमदारांमध्ये महेंद्र थोरवे यांचाही समावेश होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडात त्यांनी शिंदे यांना साथ दिली.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आलेल्या आमदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी कर्जत खालापूर मतदार संघात त्याचा फारसा प्रभाव जाणवला नाही. आपल्या आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये थोरवे यांनी विकासाची अनेक कामे करून मतदारसंघावर आपला ठसा उमटवला.
52 फुटांची विठ्ठलाची मूर्ती
कर्जत खालापूर पट्ट्यात वारकऱ्यांची संख्या मोठी आहे. रायगड जिल्ह्यात जो काही वारकरी संप्रदाय आहे त्यातील बहुसंख्य वारकरी एकट्या कर्जत खालापूर पट्ट्यात राहतात. उल्हास नदीच्या काठी महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेली श्री विठ्ठलाची 52 फुटांची मूर्ती वारकऱ्यांच्या कौतुकाचा आणि आनंदाचा विषय ठरली आहे. पंचायत समिती कर्जत रोड येथे विकसित करण्यात आलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक देखील पर्यटकांना आणि इतिहास अभ्यासकांना आकर्षित करून घेत आहे.
कर्जत चौकाची सुधारणा
कर्जत चौक रोड हा एक महत्त्वाचा परिसर आहे. महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारातून 90 कोटी रुपये खर्च करून या परिसराचे रुपडे पालटण्यात आले. त्यामुळे मुंबई आणि ठाणे परिसरात जाणाऱ्या नागरिकांची मोठी सोय होत आहे. स्थानिकांना आता या महानगरांची सहज संपर्क साधने सुलभ होणार असून रोजगारासाठी अन्यत्र जाणाऱ्या तरुणांनाही याचा लाभ होणार आहे.
नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार
डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी हे रायगड आणि परिसरातील नागरिकांसाठी एक श्रद्धास्थान आहे. त्यांच्या नावाने कर्जत येथे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. धर्माधिकारी यांना केलेले हे एक वंदनाच आहे. आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान असलेल्या कर्जत आणि रायगड वासियांसाठी एक महत्त्वाची घडामोड आहे. कर्जत येथील पोलीस मैदानाजवळ महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारातून प्रशासकीय भवन उभारण्यात आले आहे. या भावनांच्या उभारणीमुळे प्रशासकीय प्रशासकीय कार्य सुलभता येणार आहे तसेच नागरिकांची देखील मोठी सोय होणार आहे.
महायुतीला वातावरण पूरक
या विकासात्मक कामांबरोबरच कर्जत खालापूर पट्ट्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडीमध्ये महेंद्र थोरवे यांचा थेट सहभाग असतो. त्यांचे कुटुंबीय पंचायत समितीच्या कामात जातीनिशी लक्ष घालत असतात. महेंद्र थोरवे यांची आमदार कितीही पहिलीच टर्म असली तरी आपल्या कामाच्या जोरावर त्यांनी जनतेच्या मनात स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे.
आतापर्यंत शिवसेनेचा संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी होता. पण आता राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाल्यामुळे आणि महायुतीचे सरकार आणण्यासाठी तिन्ही घटक पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांनी जातीनिशी प्रयत्न केल्यामुळे या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी असा संघर्ष उद्भवण्याची चिन्हे नाहीत. शेतकरी कामगार पक्षाची अवस्था ही जिल्ह्यात क्षीण झाली आहे. त्यामुळे कर्जत खालापूर मतदारसंघातून महेंद्र थोरवे पुन्हा विजय मिळवतील अशी खात्री यांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.












Click it and Unblock the Notifications