यांच काही मला माहिती नाही, पण मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार- दादांचा शिंदेंना टोला अन् एकच हशा
महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव अखेर निश्चित झाले. महायुतीच्या नेत्यांनी आज सत्तास्थापनेसाठी राज्यपालांना समर्थनाचे पत्र देऊन विनंती केली. त्यानंतर उद्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी गेलेल्या महायुतीच्या नेत्यांनी त्यानंतर पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी संबोधन केले. तर उद्या कोण कोण शपथविधी घेणार, या प्रश्नावरुन पत्रकार परिषदेत अजित पवार व एकनाथ शिंदे यांची चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली.
नेमकं काय झालं पत्रकार परिषदेत?
पत्रकारांनी विचारले की, उद्या देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आणखी कोण कोण शपथ घेणार आहे.यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, संध्याकाळी आम्ही त्यावर निश्चित सांगू. मी मंत्रीमंडळात असावे की नाही त्याचा निर्णय मी संध्याकाळी सांगतो. देवेंद्र फडणवीस यांनी मला विनंती केलेली आहे. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे, असे म्हणत असताना अजित पवार म्हणाले की, मला यांचे काही माहिती नाही, पण मी मात्र उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे, असे म्हणून चांगलाच हशा पिकला. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, दादांना सकाळी आणि संध्याकाळी शपथविधी घेण्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी सांगितले. शिंदे यांनी दिलेल्या टोल्यानंतर पुन्हा एकदा हशा पिकला अन् सर्वच नेते हसू लागले.

आश्वासन पूर्ण करण्यासाठी सरकार काम करेलं
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील अडिच वर्षात एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मी असं तिघांनी एकत्रितपणे निर्णय घेतले आहेत. आज देखील आम्हाला हे पद तांत्रिक बाब आहे. इतर आमच्या मित्र पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रातील लोकांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी प्राणपणाने हे सरकार काम करेलं. मी एकनाथ शिंदे यांचं आभार मानतो. त्यांनी मला मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी, असं पत्र दिलेलं आहे. अजित पवार आणि इतर पक्षांनीही पत्र दिलेलं आहे. मी सर्वांचं आभार मानतो. रामदास आठवले यांचेही मी आभार मानतो.
आम्ही एकत्रीतपणे निर्णय घेणार आहोत
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, पंतप्रधान यांच्या उपस्थितीत होणार आहे. किती मंत्री शपथ घेणार या संदर्भात संध्याकाळी माहिती देऊ. आम्ही एकत्रीतपणे निर्णय घेणार आहोत. काल एकनाथ शिंदे यांची मी भेट घेतली आणि त्यांनी या मंत्रीमंडळात राहावं अशी विनंती केली. तेही सकारात्मकता दाखवतील याची मला खात्री आहे. जी आश्वासन दिली आहे ती पुर्ण करु, असा निर्धारही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मी दिल्लीला कोणाला भेटायला गेलो नव्हतो - अजित पवार
अजित पवार म्हणाले, मी दिल्लीला कोणाला भेटायला गेलो नव्हतो, तर माझ्या कामासाठी गेलो होतो. बंगल्याच्या संदर्भात अर्किटेकला भेटायचं होतं. सोबत आमच्या केसेस सुरु आहे, त्या संदर्भात वकिलांना भेटायचं होतं. इथल्यापेक्षा तिथे आराम मिळतो. म्हणून डोक्यातून काढून टाका मी कोणाला भेटायला गेलो होतो.












Click it and Unblock the Notifications