महायुती, महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं? तिसऱ्या आघाडीद्वारे 'मविआ'ला बॅकफूटवर आणण्याचे प्रयत्न!
Mahayuti, MVA seat allocation decided :राज्यात विधानसभा निवडणुकीपुर्वी शाह-काटशांहचे राजकारण सुरु असून आमदारांचेही पक्षांतर सुरु आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत असून वेगवेगळ्या छोट्या पक्षांची, संघटनांची तिसरी आघाडी तयार करून महाविकास आघाडीच्या मतांत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. अर्थातच महायुतीकडून मविआला निवडणुकीत बॅकफुटवर आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडं महायुती, महाविकास आघाडीचं जागावाटप ठरल्याचंही बोललं जात आहे.
येत्या दोन महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. या निवडणुकीचे वेगळेपण म्हणजे यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या राज्यातील दोन प्रमुख पक्षांचे दोन गट समोरासमोर असणार आहेत. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी कायम राहिली तर महाविकास आघाडीत शिवसेना (ठाकरे गट) आणि महायुतीत भाजप मोठा भाऊ असणार आहे.

बंडोबांना थंड करण्याचे आव्हान
निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. वरिष्ठ नेत्यांचे दौरे वाढले असून, जिल्ह्यानिहाय आढावा घेतला जात आहे. इच्छुकांच्या मुलाखती, पक्षाचे मेळावे, विविध घोषणा वाढल्या आहेत. पण, महाविकास आघाडी आणि महायुतीतही जागा वाटपावरून तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ऐनवेळी होणारी बंडाळी रोखण्याचे आव्हान सर्वच पक्षांपुढे असणार आहे.
महाविकास आघाडीत कुणाला किती जागा?
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीत मोठा भाऊ ठरणार आहे. विधानसभेसाठी आघाडीतील जागावाटप प्राथमिकदृष्ट्या निश्चित झाले असून, शिवसेना ठाकरे गट 110, काँग्रेस 100 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाची 70 जागांवर सहमती झाल्याची माहिती आहे. उर्वरित जागा समाजवादी, शेकाप, डावे अशा समविचारी मित्रपक्षांना सोडल्या जाणार आहेत.
जागा वाटप कळीचा मुद्दा
महाविकास आघाडीत सर्वांत कळीचा मुद्दा जागावाटपाचा आहे. मात्र, त्यातून सहज मार्ग निघणार असल्याची माहिती आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट व पुरोगामी विचारसरणीच्या मित्रपक्षांसोबत आघाडी करून लढावे. जागावाटपात एक पाऊल मागे यावे लागले तरी चालेल पण महाराष्ट्रात आघाडीचे सरकार आले पाहिजे, अशा सूचना राहुल गांधी यांनी प्रदेश काँग्रेस नेत्यांना दिल्या आहेत.
शरद पवार यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची हवा काढण्यासाठी एक पाऊल मागे येण्याची तयारी दाखवली आहे. जिंकू शकेल त्या पक्षाला जागा व जिंकणारा उमेदवार या निकषावरच आघाडीतील जागावाटप केले जाणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गट आघाडीत मोठा भाऊ ठरणार आहे. ठाकरे गटाला 110, काँग्रेसला 100 तर राष्ट्रवादीला 70 तर डाव्या विचारांच्या विविध पक्षांना उर्वरित 8 जागा असा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे.
महायुतीचे काय चाललेय
विधानसभेसाठी महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम टप्प्यात असले तरी महायुतीत मात्र म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. असे असले तरी भाजपनेसुद्धा आता महायुतीत लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप महायुतीत 155 ते 160 जागा लढेल, असे सांगितले जात आहे. शिवसेना (शिंदे गट) 70 ते 75 तर राष्ट्रवादी कॉग्रेसला (अजित पवार) 55 ते 60 जागा मिळतील, असे सांगितले जाते. राज्यात वेगवेगळ्या छोट्या पक्षांची, संघटनांची तिसरी आघाडी तयार करून महाविकास आघाडीच्या मतांत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.(Mahayuti, MVA seat allocation decided)












Click it and Unblock the Notifications