परतीच्या पावसाचा राज्यात धुमाकूळ; पुणे, रायगडमध्ये रेड अलर्ट तर 'या' जिल्ह्यांत मुसळधार कोसळणार
maharashtra weather update : मान्सूनच्या परतीच्या पावसानं राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज देखील राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. लातूरमधील मुरुडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेकडो नागरिकांना स्थलांरित करावे लागले आहे. परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
आजही पावसाचा जोर कायम राहणार
राज्यातील बहुतांशी भागात मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप पाहायला मिळाली. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसल्या, अशातच आता राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढताना दिसत आहे. मान्सूनच्या परतीची वाटचाल सुरू असतानाच राज्यात परतीचा पाऊस सक्रिय झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज पावसाचा जोर कायम राहणार असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

परतीच्या पावसाचा जोर आणखी वाढणार
मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे थोडा दिलासा मिळालाय. या परतीच्या पावसाचा जोर आणखी वाढणार असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार बरसेल असा अलर्ट हवामान विभागा डून जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांत कोसळणार मुसळधार पाऊस
विदर्भात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अमरावती या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. इथं पुन्हा एकदा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईसह ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशीव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ सांगली, सोलापूर या जिल्हयांतही मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कोल्हापूरला पावसाने सलग तीन दिवस झोडपले
मागील तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला झोडपून काढले आहे. मंगळवारी दुपारी शहरात काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी मध्यम सरी कोसळल्या. मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मंगळवारी रात्री 9 वाजता पाणी पातळी 13 फूट 4 इंचांवर होती. गेल्या 24 तासांत कोल्हापुरात 11 मि.मी. पाऊस झाला असून, आज बुधवारी (दि. 25) देखील 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
लातूरमध्ये शेकडो नागरिकांचे स्थलांतर
लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. लातूर तालुक्यातील मुरुड गावात ढगफुटी सदृश्य मुसळधार पडला. मुरुड गावातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना गावातील दत्त मंदिरात आश्रय देण्यात आला आहे. जवळपास 200 नागरिकांचे करण्यात आले स्थलांतर करण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications