हवामान अंदाजाने महिन्याच्या सुरुवातीलाच भरवली धडकी; पुणे, मुंबई, नागपूर, नाशिकची परिस्थिती काय?
महाराष्ट्राचे हवामान गेल्या महिन्यांपासून अचानक बदललेले दिसले आहे. एप्रिल महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा मारा सोसावा लागला होता. त्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले. आता मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील हवामानाचे अंदाज वर्तविले गेले असून हे अंदाज अनेकांनाच धडकी भरवणारे ठरले आहेत. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये देशभरातील विविध भागांत हवामानात बदल अपेक्षित आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये पावसासह गारपिटीचा इशारा असून, उत्तर आणि मध्य भारताला मात्र उकाडा सहन करावा लागणार आहे. दक्षिण भारतामध्ये काही भागांमध्ये ढगाळ वातावरणामुळं तापमानात किंचित घट पाहायला मिळेल.

मुंबईतील हवामानाचा अंदाज
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये कमाल तापमानाच दोन ते तीन अंशांची घट अपेक्षित आहे. दमट वातावरणामुळं उष्मा घाम फोडताना दिसण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांमध्येही सूर्याचा कहर सुरूच राहील. मधूनच येणारी अवकाळीची सर गोंधळ उडवून जाईल, असेही सांगण्यात आले आहे. महिन्यांच्या सुरुवातीला मराठवाडा, विदर्भामध्ये आकाश अंशत: ढगाळ राहील. तर पुढच्या 2 ते 5 दिवसांसाठी येथील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठवाड्यात गर्मी वाढणार
मराठवाड्यात काही ठिकाणी तापमान उष्ण आणि दमट असेल. धाराशिव, लातूर आणि नांदेडमध्ये ढगाळ वातावरणासह पावसाच्या तुरळक सरींची शक्यता असल्याची बाब हवामान विभागानं स्पष्ट केली आहे. राज्याच्या उत्तर कोकणासह पूर्व विदर्भ वगळता उर्वरित जिल्हांमध्ये उष्णतेच्या लाटेसम परिस्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. मे महिना दमदार उन्हाळी पावसाचा असेल असा अंदाज या महिन्याच्या सुरुवातीलाच वर्तविण्यात आला आहे. तापमान वाढीमुळं उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहणार आहेत. मे महिन्यात महाराष्ट्रासह मध्य भारत, दक्षिण भारतात भारतात उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. उत्तर किनारपट्टी वगळता उर्वरित राज्यात उन्हाळी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडण्याचा अंदाज आहे.
कसे राहिल हवामान?
विदर्भात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसाचा अलर्ट देण्यात आला असला तरी, तामान मात्र कायम राहणार आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ४२ ते ४४ अंशापर्यंत राहिल. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ४२ अंशाच्यावर तापमान राहिल. बुधवारी संभाजीनगरमध्ये ४२.६, परभणी ४३.४, बीड ४२.१, लातूर-धाराशिव ४१, जळगाव- नांदूरबार ४३ अंश तापमान राहिले. पुण्यात पुढील दोन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात बुधवारी ४०.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.












Click it and Unblock the Notifications