Maharashtra weather: पुढील 4-5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका
Maharashtra Weather Update News : महाराष्ट्रात मे महिन्याची सुरुवात झाली अन् पहिल्याच आठवड्यात पावसाने नागरिकांना चकवा दिला. राज्यात पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती झालेली आहे. तर काल सोमवारी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये काल अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर आजही हवामान विभागाने तसा इशारा दिला आहे.
पुढील तीन दिवस पावसाची शक्यता!
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या कोकण क्षेत्रापासून मराठवाडा आणि विदर्भासह उत्तर महाराष्ट्रालाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत देखील 6 ते 8 मे या कालावधीसाठी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील बहुतांश भागांमध्ये दिवसा काहीसं ढगाळ वातावरण आणि सायंकाळंतर सोसाट्याचा वारा सुटून पावसाच्या तुरळक सरींची अपेक्षा वर्तवण्यात आली आहे.
परिणामी, पुढील तीन दिवस राज्यासह मुंबईत पावसामुळे तापमानात किंचित घट होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. शहरातील हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्याकारणांमुळे उष्मा मात्र अधिक त्रासदायक ठरेल ही वस्तूस्थिती असेल.

उत्तर भारतातील राज्यांमध्येही पावसाचा इशारा!
हवामान विभागाने (IMD) 6 मे 2025 रोजी जारी केलेल्या अंदाजामुळे उष्णतेने त्रस्त असलेल्या लोकांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. आयएमडीच्या मते, आज उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत अनेक राज्यांमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलू शकतो.
काही ठिकाणी जोरदार वारे वाहतील, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. यामुळे केवळ तापमान कमी होणार नाही, तर उष्णतेच्या लाटेसारख्या परिस्थितीपासून काही प्रमाणात आराम मिळू शकेल. हवामान खात्याच्या अहवालात विशेषतः दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि कर्नाटक यासारख्या राज्यांमध्ये पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कशी असेल पावसाची शक्यता?
- राज्यात ठिकठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशांवर पार गेला असतानाच पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.
- तर मुंबईतही ६ आणि ७ मे रोजी पावसाची शक्यता आहे. ५ ते ७ मे दरम्यान नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव अवकाळीच्या तीव्रतेबरोबर गारपिटीची शक्यता आहे.
- अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये ६ व ७ मे, मराठवाड्यात ७ मे, विदर्भात ५ मे रोजी अवकाळीबरोबर गारपिटीची शक्यता आहे तर दुसरीकडे कोकण ३४ ते ३५ डिग्री व विदर्भात ४२ ते ४४ डिग्री तापमान नोंदविले जात आहे.
- राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला असतानाच, रविवारी वाशिमने सर्वाधिक तापमानाची नोंद केली. वाशिममध्ये कमाल तापमान ४२.८ अंश सेल्सिअस इतके होते. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
- राज्यातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उष्णतेच्या झळांनी विविध जिल्ह्यांत नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. घराबाहेर पडताना धडकी भरेल एवढे तापमान राज्यभरात नोंदवले जात आहे. त्यामुळे जनजीवनावर परिणाम दिसून येत आहेत.
उत्तर आणि पूर्व भारतात वादळासह पावसाचा इशारा
आज उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागात पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. या भागात ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये हलक्या पावसाची शक्यता
राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. यामुळे तापमानात थोडीशी घट होऊ शकते.
मुंबई आणि दक्षिण भारतातही हवामान बदलेल
मुंबई आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात वादळाची शक्यता आहे. त्याच वेळी, बेंगळुरू आणि दक्षिण भारतातील इतर भागात हवामान आल्हाददायक राहू शकते.


Click it and Unblock the Notifications
