महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी योग्य नेता कोण? कुमार केतकर यांची खास मुलाखत वन इंडिया मराठी वर
आरती कुलकर्णी
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची धामधूम आता सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पाठोपाठ ही निवडणूक होत असली तरी या निवडणुकांच्या निकालावरून विधानसभा निवडणुकांचा अंदाज बांधणं चुकीचं ठरेल, असं मत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी व्यक्त केलं आहे.
महाराष्ट्राच्या मनात काय नेमकं काय आहे, असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. कुमार केतकर यांच्या मते, महाराष्ट्राच्या मनात काय? हा प्रश्न खूपच व्यापक आहे. प्रत्येक विभागात वेगळी परिस्थिती आहे. यामध्ये मराठवाड्यावर सगळ्यांचंच लक्ष आहे. तिथली परिस्थिती मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे पूर्णपणे बदलून गेली आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र इथेही वेगवेगळ्या पक्षांमध्ये आणि नेत्यांमध्ये चुरस आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीत मराठी विरुद्ध गुजराथी असा संघर्ष पाहायला मिळतो आहे आणि गुजराथी लोकांना मोदी आणि शहा यांचं समर्थन आहे, असाही आरोप केतकर यांनी केला.
लाडकी बहीण, लखपती महिला अशा योजनांमधून प्रचंड प्रमाणात पैशाचं वाटप सुरू आहे. पण फक्त पैसे देऊन लोकांची मतं मिळवता येतात, असं नाही. लोक एखाद्या पक्षाला किंवा नेत्याला कसं मत देतात यात अनेक मुद्दे असतात, असंही कुमार केतकर म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आत्ता जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते आणि शिवाजी महाराजांचा पुतळा पडला असता तर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र पेटवला असता. पण विरोधी पक्षांनी संयम राखला ही चांगली गोष्ट आहे हेही त्यांनी नमूद केलं.

देशात आणि राज्यात हिंदू - मुस्लीम ध्रुवीकरणाचं राजकारण घातक ठरतं आहे. नितेश राणे ज्या पद्धतीने या मुद्द्यावर बोलत आहेत ते चिंताजनक आहे. देवेंद्र फडणवीस यांचं याला समर्थन असल्याशिवाय ते असं बोलणं शक्यच नाही, असा दावाही केतकर यांनी केला.
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची तिसरी टर्म कशी आहे याचंही विश्लेषण कुमार केतकर यांनी या मुलाखतीत केलं आहे. राहुल गांधी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरतात. हे त्यांचं विभाजनवादी राजकारण नाही का ? या प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिलं. तसंच आरक्षण हवं की नको यावरही त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली.
महाराष्ट्रामध्ये अजून महिला मुख्यमंत्री झालेल्या नाहीत. सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे अशा नेत्यांकडे राज्याचं नेतृत्व आलं तर फरक पडेल का ? असा प्रश्नही आम्ही त्यांनी विचारला. त्यावर कुमार केतकर यांनी जगभरातल्या महिला राज्यकर्त्यांनी केलेल्या कामाची आठवण करून दिली. अमेरिकेत कमला हॅरिस राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत. त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष झाल्या तर नक्कीच बदल घडणार आहे, असंही कुमार केतकर म्हणाले.












Click it and Unblock the Notifications