Maharashtra New CM : भाजप नेतृत्वाने पुन्हा फडणवीसांवर विश्वास का टाकला; वाचा 5 प्रमुख कारणं
Maharashtra New CM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हा पडलेला प्रश्न अखेर सुटला. आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन त्यात एकमताने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
भाजप आणि त्यांच्या सर्वोच्च नेतृत्वाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे. चला तर जाणून घेऊया, देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिसऱ्यांदा शीर्ष नेतृत्वाने विश्वास का ठेवला, महाराष्ट्राची कमान त्यांच्या खांद्यावर का देण्यात आली.

फडणवीसांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्यापासून फडणवीसांचा एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. त्या व्हिंडिओत ते म्हणाले की, 'मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बना लेना, मैं समंदर हूं लौटकर वापस आऊंगा।' महाराष्ट्राच्या विधानसभेत उद्धव ठाकरेंनी फसवलं होतं. खरंच पुन्हा देवेंद्र फडणवीस हे वापस आले आहेत.
20 नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला राज्यात ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या 54 वर्षीय ब्राह्मण नेत्याला पक्षाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री राहिलेले ते राज्यातील दुसरे ब्राह्मण नेते आहेत आणि पुन्हा मुख्यमंत्रीही होणार आहेत. त्यांच्या आधी शिवसेनेचे मनोहर जोशी हेच ब्राह्मण नेते राज्याचे मुख्यमंत्री होते.
संयमाचे फळ अखेर कामाला आले
भाजपने एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या संयमाचे फळ दिले आहे. 2019 मध्ये महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचा विजय झाला होता. पण, निकाल आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी निवडणूकपूर्व युती तोडली, त्यामुळे फडणवीस सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यापासून राहिले. मधल्या काळात अजित पवार यांच्यासोबत त्यांनी सरकार स्थापन केले असले तरी ते काही तासांतच पडले.
उद्धव ठाकरे यांचा पक्ष अडीच वर्षांनी फुटला तेव्हा फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील असे वाटत होते. मात्र, त्यांनी शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करून घेतले. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी अडीच वर्षे तन्मयतेने काम केले आणि कधीही पदावनती झाल्याची खंत व्यक्त केली नाही.
भाजप आणि नेतृत्वावर निष्ठा
शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा पक्षाने त्यांना उपमुख्यमंत्री बनण्यास सांगितले. फडणवीस यांना यात अजिबात रस नव्हता. ही काळाची गरज असून महायुतीचे सरकार नीट चालवायचे असेल तर त्यांच्यासारखा नेता त्यात सहभागी होणे गरजेचे आहे, असे संकेत त्यांना नेतृत्वाकडून मिळाले. त्यांनी नेतृत्वाच्या सूचना स्वीकारल्या. याचा आपल्या वैयक्तिक राजकीय प्रतिमेवर कसा परिणाम होईल याचा त्यांनी कधी विचार केला नाही. त्यांनी पक्षाच्या आदेशाचे पालन केले होते.
फडणवीसांची निष्कलंक प्रतिमा
महाराष्ट्रातील एका प्रभावशाली नेत्याच्या घरातून फडणवीस इथपर्यंत पोहोचले आहेत. त्यांचे वडील गंगाधर फडणवीस हे आधी जनसंघ आणि नंतर भाजपशी संबंधित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक भाजप नेते त्यांना 'राजकीय गुरु' म्हणतात. फडणवीस यांचे वडील आणि काकू दोघेही आमदार राहिलेले होते. पण, फडणवीस यांनी निवडणुकीच्या राजकारणाला सर्वसामान्य नगरसेवकापासून सुरुवात केली आणि नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले आणि पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री आणि अडीच वर्षे उपमुख्यमंत्री झाले, पण त्यांच्यावर कधीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. तर 1999 पासून ते विधानसभेत काम करत आहेत.
राजकीय रणनीतीत पारंगत
महाराष्ट्रात यावेळी भाजपचा मोठा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर हा विजय मिळालेला आहे. अवघ्या पाच महिन्यांत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आणि महायुतीला राज्यातील निवडणुकीचे चित्र बदलण्यात यश आले आहे.
त्यांनी आपल्या सामरिक कौशल्याने मराठा आंदोलन आणि विरोधकांचे सर्व नकारात्मक नरेटिव्हला हाणून पाडले. गोष्टी स्वीकारण्याच्या आणि मोजून निर्णय घेण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे पक्षाचा त्यांच्यावरील विश्वास आणखी वाढला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या केंद्रस्थानी आले होते. त्यानंतर ते महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष होते. त्या निवडणुकीत मोदी लाट होती आणि त्या लाटेला महाराष्ट्रात धार देण्यात फडणवीसांचाही मोठा वाटा होता.
विकासाला महत्त्व देणारा नेता
देवेंद्र फडणवीस यांची विकासाला महत्त्व देणारा नेता अशी ओळख आहे. ते राज्यातील मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना चालना देण्यासाठी ओळखले जातात, ज्यामुळे त्यांचा विशेष प्रभाव शहरी तरुणांमध्ये वाढला आहे. खुद्द पंतप्रधान मोदी हे विकासाला प्राधान्य देण्यासाठी ओळखले जातात, त्यामुळे फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात त्यांच्या प्रतिमेचाही मोठा परिणाम झाला आहे. (साभार- पीटीआय इनपुट)












Click it and Unblock the Notifications