महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून ‘या’ भागात रेड आणि ऑरेंज अलर्ट जाहीर
भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील निवडक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय
कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, ते 23 मे संध्याकाळपर्यंत अधिक तीव्र होऊन अवदाबात रूपांतरित होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. याचा परिणाम म्हणून कोकण (मुंबई, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर), मध्य महाराष्ट्र (पुणे, सातारा, सोलापूर), मराठवाडा (बीड, परभणी, नांदेड), तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वाढली आहे.
मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट; रायगड-रत्नागिरीसाठी रेड अलर्ट
मुंबईसह कोकण किनारपट्टीसाठी 22 ते 24 मे दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः 23 मे रोजी संध्याकाळपासून मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी आणि जलजमाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आज (23 मे) अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली असून, हवामान विभागाने या भागांसाठी रेड अलर्ट घोषित केला आहे. पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. इतर भागांत येलो अलर्ट जारी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
धाराशिव जिल्ह्यात पावसाचा कहर
धाराशिव जिल्ह्यातील 7 तालुक्यांत जोरदार पावसाची नोंद झाली आहे. माकणीमध्ये सर्वाधिक 81 मिमी पावसाची नोंद झाली असून, धाराशिव शहरातही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शेती पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून, आंबा, केळी आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यांमुळे वीज खांब पडणे, तारा तुटणे यासारख्या घटना घडल्या असून वीजपुरवठा खंडित झाला आहे.
बुलढाण्यात धुक्याची चादर
मे महिन्यात सामान्यतः कडक उन्हाळा जाणवतो, परंतु यंदा बुलढाणा जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून पावसाचा जोर सुरू असून, हवामानात गारवा पसरला आहे. आज सकाळपासून बुलढाणा शहरात धुक्याचे आवरण पसरले असून, राजूर घाटातही धुक्याची दृश्ये पाहायला मिळाली. वाहनचालकांना वाहतूक करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यामुळे सकाळी फिरायला येणाऱ्यांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण आहे.
रायगडमध्ये ढगाळ हवामान
रायगड जिल्ह्यात आज आकाश पूर्णपणे ढगांनी आच्छादले असून, समुद्रकिनारी असणाऱ्या गावांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. समुद्रात उंच लाटा उसळत असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांना हवामान विभागाचा सल्ला
सर्वच भागांत नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, विजेच्या तारांपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. पुरस्थिती, झाडे उन्मळणे, वीज खंडित होणे या घटनांमुळे अडथळे निर्माण होऊ शकतात.
(टीप: ही बातमी 23 मे 2025 रोजी सकाळपर्यंत प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आली आहे. हवामान बदलाच्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाचे अपडेट्स पाहणे आवश्यक आहे.)












Click it and Unblock the Notifications