महाराष्ट्राचे राज्यपाल बदलले; उपराष्ट्रपतीपदी निवड, राधाकृष्णन यांचा राजीनामा; यांना मिळाली जबाबदारी
Maharashtra Governor Change : भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. तर महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सूत्रे आता गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हाती देण्यात आली आहेत. आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.

राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड
गेल्या काही काळापासून महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सी.पी. राधाकृष्णन यांची नुकतीच भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाली. त्यामुळे त्यांना राज्यपालपद सोडावे लागले.
राजभवनात त्यांची कारकीर्द शांत आणि प्रभावी राहिली. आपल्या कार्यकाळात त्यांनी राज्याच्या विकासासाठी विविध उपक्रमांना पाठिंबा दिला. आता उपराष्ट्रपती म्हणून ते देशाची सेवा करतील.
आचार्य देवव्रत यांच्याकडे दुहेरी जबाबदारी
सी.पी. राधाकृष्णन यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची तात्पुरती जबाबदारी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे देण्यात आली आहे.
ते गुजरातच्या राज्यपालपदाचा कार्यभार सांभाळत महाराष्ट्राचेही कामकाज पाहतील. राज्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा बदल आहे, कारण आता दोन राज्यांची जबाबदारी एकाच व्यक्तीकडे आली आहे.
या बदलामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. आचार्य देवव्रत हे राज्यपालपदाची जबाबदारी कशी पार पाडतात आणि त्यांचे पुढील निर्णय काय असतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर कायमस्वरुपी नियुक्ती कोणाची होईल, याची देखील चर्चा रंगली आहे.












Click it and Unblock the Notifications