लवकरच कर्जमाफीची घोषणा होणार? महायुती सरकारमधील मंत्र्यांनी दिले संकेत
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील, असे संकेत महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.

कर्जमाफीबाबत मंत्रिमंडळात चर्चा सुरू
पुसद येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री संजय राठोड म्हणाले की, "संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात सध्या चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच यासंदर्भात निर्णय घेऊन कर्जमाफीची घोषणा करतील." वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात राज्यातील १३ प्रयोगशील शेतकऱ्यांचा 'कृषी गौरव पुरस्कार' देऊन सन्मान करण्यात आला.
राज्यात एकीकडे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी 'सात-बारा कोरा करा' अशी मागणी लावून धरली आहे. प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनीही यासाठी आंदोलन केले होते. त्यामुळे, सरकारवर वाढलेला दबाव लक्षात घेता कर्जमाफीचा निर्णय लवकर होण्याची शक्यता आहे.
कृषिमंत्र्यांचेही सूतोवाच
यापूर्वी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची गरज असल्याचे मान्य केले होते. "मी शेतकरीपुत्र असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी मला चांगल्या प्रकारे माहित आहेत," असे ते म्हणाले होते. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून यावर योग्य वेळी निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
सध्याच्या परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही जोर धरत आहे. या सर्व मागण्यांच्या पार्श्वभूमीवर मंत्री संजय राठोड यांनी दिलेले संकेत महत्त्वपूर्ण मानले जात आहेत.












Click it and Unblock the Notifications