मनोज जरांगेंच्या निर्णयावर संजय राऊत स्पष्ट बोलले, म्हणाले...
मुंबई : शेकापला अलिबाग, पेण आणि पनवेल या तीन जागा सोडल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी आज स्पष्ट केलं. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी त्यांच्या मित्रपक्षांना मनाजोग्या जागा सोडल्यामुळे आमच्यात कोठेही कलह नाही, बंडखोरी होणार नाही, असा पुनरुच्चार खा. राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. मनोज जरांगे यांच्या माघारीवरही त्यांनी भाष्य केले.

जरांगे यांच्याबद्दल राऊत म्हणाले...
मराठा आंदोलनक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णयावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'जरांगेचा संघर्ष समाजासाठी आहे. समाज त्यांच्या पाठिशी आहे. त्यांच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे. मनोज जरांगे पाटील यांचा सातत्याने महाराष्ट्रात जो संघर्ष सुरू आहे, तो त्यांच्या समाजाच्या विकासासाठी, उद्धारासाठी आहे. आणि त्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली, हे मान्य केलं पाहिजे. समाज त्यांच्या पाठिशी एकसंघपणे उभा आहे.
निवडणुकीसंदर्भात काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा जो लढा आहे तो राजकीय नव्हे , सामाजिक आहे अस आम्ही मानतो. ती एक सामाजिक चळवळ आहे. त्यामुळे जरांगे यांनी काय आणि कशी भूमिका घ्यावी, याचं मार्गदर्शन आम्ही करणार नाही. त्यांच्या लढ्याला आमच्या कायम शुभेच्छा आणि पाठबळ असेल, असं राऊत म्हणाले.
शेकापला सोडल्या तीन जागा
लोकसभेत आम्हाला मित्रपक्षांनी साथ दिल्याने विधानसभेसाठी त्यांच्यासाठी जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेकाप नेते जयंत पाटील यांची आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा झाल्यानंतर शेकापसाठी अलिबाग, पेण आणि पनवेल हे तीन मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. त्यांना मविआतील बंडखोरीबाबत प्रश्न विचारण्यात आला. ज्यावेळी त्यांनी मविआतील मित्रपक्षांसाठी प्रमुख तिन्ही पक्षांनी जागा सोडल्या असल्याची माहिती दिली.
मविआचंच सरकार येईल- राऊत
यंदाच्या निवडणुकीत अजित पवार हे किंगमेकर ठरतील, असं विधान अजित पवार गटाचे शिवाजीनगर- मानखुर्द विधानसभेचे उमेदवार नवाब मलिक यांनी केलं. त्यावर संजय राऊतांनी भाष्य केलं. निकाल लागल्यावर कळेल कोण किंगमेकर आणि कोण किंग आहे ते... उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच सरकार येईल. या राज्यामध्ये 26 तारखेला महाविकास आघाडीच सरकार स्थापन झालेलं आपण पहाल. कोण काय बोलताय कोणाचे काय दावे आहेत हे आता कशा करता? आधी जिंकून या, अजित पवार यांच्यासह आधी सर्व जिंकून या. बारामतीची निवडणूक आता सोपी राहिलेली नाही, असं संजय राऊत म्हणाले.












Click it and Unblock the Notifications