जागावाटपाच्या चर्चेआधी संजय राऊतांनी या नेत्यांना डिवचलं..वाचा पुढं काय झालं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीची महाराष्ट्रात अद्याप घोषणा झालेली नाही पण जशी जशी घोषणांची शक्यता वाढत आहे तसे तसे राजकीय पक्ष आपला जोर लावत जनाधार मिळवण्यासाठी ना-ना तऱ्हेने खटाटोप करत आहेत. महाविकास आघाडीत जागावाटपासाठी आज चर्चा होत आहे. त्याआधी संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे एक बाॅम्ब फोडला आहे. त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना डिवचले आहे.
आजच्या बैठकीला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत तसेच पक्षाचे दुसरे वरिष्ठ नेते खासदार अनिल देसाई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड तसेच राखी जाधव उपस्थित राहणार आहेत.

नेमके काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यांनी जागावाटपांसंदर्भात होत असलेल्या विलंबावर भाष्य केले काँग्रेसचे नेते जास्त व्यस्त असल्याने आम्ही त्यांना चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या खास शैलीत काँग्रेस नेत्यांचा समाचार घेतला. संजय राऊत म्हणाले की, "काँग्रेस पक्ष सध्या खूप व्यस्त आहे, तरीही आम्ही हे प्रकरण संपवावे, यासाठी आज त्यांना बोलावले आहे." आम्ही काँग्रेस नेत्यांना बोलावले आहे, काँग्रेस नेते इतके व्यस्त आहेत की ते तारखांमागून तारखा देत आहेत. जागावाटपावर चर्चा करण्यासाठी त्यांना आजपासून तीन दिवसांसाठी बोलावण्यात आले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना उद्देशून भाष्य जरी केले असले तरीही काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत संजय राऊत यांनी मोठी बाजू लावून धरली. राहुल गांधींविरोधात मोठे षडयंत्र रचले जात आहे. त्यांचा जीव धोक्यात आहे, राहुल गांधींविरोधात बोलणाऱ्यांवर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.
निवडणुका कधी?
राज्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधक असलेली महाविकास आघाडी यांच्यात शाब्दिक वार सुरु आहेत. तर दुसरीकडे या दोन्हीतून राजकीय नेते आमदार आणि माजी आमदार पक्षांतर करत आहेत. त्यामुळे आतापासूनच निवडणुकीचा धुराळा वाढत आहे. पण राज्यात निवडणुका कधी हे मात्र अजून स्पष्ट नाही, यासंदर्भात अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगानेच नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ शकतात असे संकेत दिले आहे. त्याआधी म्हणजेच सप्टेंबरच्या शेवटी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्याआधी जागावाटपाबाबत सत्ताधारी आणि आघाडीतही चर्चा सुरू आहे.












Click it and Unblock the Notifications