महाविकास आघाडीत बेबनाव..? संजय राऊतांनी काँग्रेसला सुनावलं..! काय म्हणाले जाणून घ्या
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसने थेट मुख्यमंत्रीपदावर दावा करु नये, अजून जागावाटप बाकी आहे. आमच्यामुळे त्यांच्या जागा वाढल्या आहेत असे वक्तव्य शिवसेना(उबाठा) नेते संजय राऊत यांनी केले आहे. तिसरी आघाडी ही सत्ताधा-यांना मदतीसाठी बनवली जात असल्याचीही टीका राऊत यांनी केली.
छोट्या पक्षांनाही स्थान देण्याचा प्रयत्न
संजय राऊत म्हणाले की, लोकसभेत 48 जागा होत्या. त्यामुळे जागा वाटप सोपे होते. आता विधानसभेत छोटे पक्ष आहेत. त्यांचाही समावेश करुन घेण्यात येणार आहे. सर्व स्थान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणत्याही जागेवर मतभेद नाही. एखाद्या दुसऱ्या जागेवर मतभेद असतील तर पुन्हा चर्चा होईल. तीन पक्षांचे वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होईल.

जो जिथं जिंकणार त्यालाच संधी दिली जाईल
राऊत यांनी सांगितले की, आज जागावाटपासंदर्भात मविआची महत्वाची बैठक पार पडणार आहे. जो जिथं जिंकणारा उमेदवार असेल त्यालाच संधी दिला जाईल काही मतभेद झालेच तर पुन्हा बैठक होईल, वरिष्ठ नेते एकत्र बसतील
तिसरी आघाडी सत्ताधा-यांच्या मदतीसाठी
राज्यात तयार होत असलेल्या तिसऱ्या आघाडीसंदर्भात देखील राऊतांना प्रश्न विचारण्यात आला . यावर राऊत म्हणाले की, तिसरी आघाडी ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी असते. कारण ती विरोधकांची मत फोडते. केंद्रात किंवा राज्यातील सत्ताधारी असतात त्यांना काही अडचणीचे विषय असतात. मग ते तिसरी आघाडी निर्माण करुन विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी माजवण्याचे काम करतात.
आतापर्यंतचा इतिहास तेच सांगतो. विधानसभेत खरी लढत महायुती आणि महाविकास आघाडीत आहे. परंतु महाविकास आघाडीची मते कमी करण्यासाठी या नवीन आघाड्या स्थापन केल्या जात आहेत. त्यासाठी पैशांचा आणि पदांचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोपही राऊत यांनी केला.
पंतप्रधान मोदींवरही टीका
संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा दौ-यावरुनही टीका केली. ते म्हणाले की, मोदी येतात-जातात, कसलं उद्घाटन करतात, त्यांनांच माहिती नसतं उद्योगांचं काय? आजही इथले उद्योग गुजरातला जातायत. जम्मू काश्मीरला मोदींनी पूर्ण राज्याच्या दर्जा देण्याची मागणी केलीय. मग आमचा जो भाग गुजरातला नेलाय, तोही परत द्या असे राऊत म्हणाले. बदलापूर प्रकरणाताल आपटे आणि कोतवालला वाचवायचं काम मुख्यमंत्री करत आहेत, कारण ते त्यांच्या मुलाच्या मतदारसंघातील लोक आहेत असेही राऊत म्हणाले.












Click it and Unblock the Notifications