संदीपान भुमरेंसमोर आव्हाने, पैठण मतदारसंघात महायुतीकडून विलासबापू भुमरे, MVA चा उमेदवार कोण?
Maharashtra Assembly Election 2024 Paithan Constituency : आता कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होऊ शकणार आहे. प्रमुख पक्षांतील इच्छुक तयारीला लागले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मतदारसंघात पाचवेळा निवडून आलेले संदीपान भुमरे हे आता छत्रपती संभाजीनगरचे खासदार झाले आहेत. त्यामुळे यावेळी महायुतीकडून त्यांचे पुत्र विलासबापू भुमरे हे मैदानात असणार हे जवळपास निश्चित झाले आहे. परंतु, त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अनेकांनी तयारी केली आहे. हा मतदारसंघ ठाकरे गटाला सुटू शकतो.
इच्छुक असलेल्या काहींनी आपापल्या पातळीवर प्रचाराला सुरवात केल्याने अनेकांची डोकेदुखी वाढली आहे. जागा एक अन् इच्छुक अनेक असे चित्र असल्याने उमेदवारी ठरविताना त्या-त्या पक्षाच्या श्रेष्ठींचा चांगलाच कस लागणार हे मात्र निश्चित आहे.

मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे लक्ष
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीच्या काळात एक महत्त्वाचा घटक बनले आहेत. ते निवडणुकीत कोणती भूमिका घेणार, हे सर्व पक्षांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. जरांगे यांच्या राजकीय भूमिकेवर या मतदारसंघांतील निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
गत निवडणुकीत काय झाले होते?
सन 2019 च्या निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे संदीपान भुमरे यांना 83 हजार 403 मते मिळाली. प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्ता गोर्डे यांना 69 हजार 264 मते मिळाली होती. या निवडणुकीतील विजयानंतर भुमरे हे रोजगार हमी योजना विभागाचे कॅबिनेट मंत्री झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही त्यांच्याकडे होते.
राजकीय समीकरणे बदलली
राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतील फुटीमुळे तालुक्यातील समीकरणेही बदलली आहेत.
या बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे महायुती व महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी चालविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पैठण मतदारसंघावर दावा केला आहे. यावरून तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. इच्छुक दावे करीत आहेत. असे असले तरी यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेतील ठाकरे व शिंदे गटात सामना रंगणार असल्याचे चित्र आहे.
सर्वच पक्षांतील इच्छुकांचा जोर!
महायुती आणि महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर झालेला नाही. पण, सुरवातीपासूनच दबाव वाढविण्यासाठी प्रबळ दावेदारी केली जात आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून दत्ता गोर्डे, मनोज पेरे, सचिन घायाळ इच्छुक आहेत. शिंदे गटाकडून खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र विलासबापू भुमरे हे एकमेव प्रबळ दावेदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे संजय वाघचौरे, विलास शेळके यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेकडून (अजित पवार) अप्पासाहेब निर्मळ इच्छुक आहेत.
काँग्रेससही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. माजी मंत्री अनिल पटेल, विनोद तांबे, रवींद्र काळे, दिलीपराव भोसले यांच्या नावांची चर्चा आहे. काँग्रेस ओबीसीकडून डॉ. कांचनकुमार चाटे यांनीही दावा केला आहे. भाजपचे विधानसभा प्रमुख डॉ. सुनील शिंदे यांनी ही जागा भाजपला सोडण्याची मागणी करून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पक्षांचे जागावाटप, उमेदवारी निश्चितीनंतरच इच्छुकांपैकी कोण बाजी मारतो, हे कळणार आहे.
या आहेत समस्या?

संदीपान भुमरे यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे झाली आहेत. परंतु, बेरोजगारी, ग्रामीण भागातील रस्ते, अनेक गावांमध्ये अजूनही नळ योजना पोहोचली नाही या समस्या कायम आहेत. पैठण एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग यायला तयार नाहीत. जायकवाडी धरणात उशाशी असूनही अनेक गावांमध्ये पाणी पुरवठा योजना नाही. शेतमालाला अल्प भाव आहे.












Click it and Unblock the Notifications