लातूरचा 'काँग्रेस' गड अभेद्य! महापौरपदी कोणाची लागली वर्णी तर उपमहापौरपद कुणाच्या नशीबाला?
Latur Mahapalika News : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या लातूर महानगरपालिकेवर पुन्हा एकदा काँग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौरपदी ॲड. स्नेहल उटगे यांची निवड निश्चित झाली आहे. या निवडीसह लातूर महापालिकेत आता 'महिला राज' अवतरले असून, काँग्रेसने भाजपचे आव्हान मोडीत काढत आपला एकमेव बालेकिल्ला राखला आहे.

संख्याबळाचे गणित: काँग्रेसची एकहाती सत्ता
लातूर महापालिकेच्या 18 प्रभागांमधील 70 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
- काँग्रेस: 43 जागा
- भाजप: 22 जागा
- वंचित बहुजन आघाडी: 04 जागा
- राष्ट्रवादी (अजित पवार गट): 01 जागा
काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती असल्याने एकूण 47 सदस्यांच्या पाठिंब्यासह काँग्रेसचा मार्ग सुकर झाला. भाजपला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागल्याने त्यांना विरोधी बाकावर बसावे लागणार आहे.
'विलासराव देशमुखांचा वारसा' आणि राजकीय चपराक
निवडणूक प्रचारादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी "विलासराव देशमुखांच्या आठवणी लातूरमधून पुसून टाकू", असे आक्रमक वक्तव्य केले होते.
या वक्तव्यामुळे लातूरची निवडणूक अस्मितेची बनली होती. मात्र, लातूरकरांनी पुन्हा एकदा देशमुख कुटुंबीय आणि काँग्रेसच्या बाजूने कौल देऊन विरोधकांना जोरदार चपराक लगावली आहे. विलासरावांचा राजकीय वारसा आजही लातूरच्या मातीत घट्ट रुजलेला असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले.
नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांचा 'रोड मॅप'
निवडीनंतर जयश्री सोनकांबळे आणि ॲड. स्नेहल उटगे यांनी शहराच्या विकासासाठी आपली प्राथमिकता जाहीर केली आहे.
जयश्री सोनकांबळे (महापौर)
"शहरातील महिलांची सुरक्षितता ही आमची पहिली प्राथमिकता असेल. संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विणले जाईल आणि स्वच्छतेच्या बाबतीत लातूरला आदर्श बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
ॲड. स्नेहल उटगे (उपमहापौर)
"रस्ते, पाणी आणि कचरा या मूलभूत समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही शास्त्रशुद्ध 'रोड मॅप' तयार करू. निसर्गाने पाणी दिले असले तरी नियोजनाअभावी पाणीपुरवठा उशिरा होतो, त्याचे सुसूत्रीकरण करून मुबलक पाणी देण्याचा आमचा मानस आहे."
विजयाचा जल्लोष
महापौर आणि उपमहापौर पदासाठी इतर कोणाचेही अर्ज न आल्याने या निवडी केवळ औपचारिक ठरल्या आहेत. निकाल स्पष्ट होताच लातूर महानगरपालिकेच्या प्रांगणात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला. "काँग्रेसचा विजय असो", "विलासराव देशमुख अमर रहे" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.












Click it and Unblock the Notifications