मोठा राजकीय भूकंप? काँग्रेसचा मोठा नेता भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत,पक्षाला मोठा धक्का
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत मोठं यश मिळवलं. त्यामध्ये भाजपनं आघाडी घेत राज्यात सर्वाधिक जागा मिळवल्या. दुसरीकडे, महाविकास आघाडीला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. फक्त 50 जागांवर समाधान मानावं लागलं, तर महायुतीचे 232 उमेदवार विजयी ठरले.

या निकालानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली असून अनेक नेते आणि कार्यकर्ते सत्ताधारी गटात सामील होताना दिसत आहेत. यामधून सर्वाधिक नुकसान शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसला होत असल्याचं चित्र आहे.
कुणाल पाटील भाजपच्या दिशेने?
धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्याभोवती सध्या राजकीय चर्चेचं केंद्र तयार झालं आहे. पाटील यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा एक मोठा मेळावा आयोजित केला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे कुठलेही चिन्ह, बॅनर किंवा नेत्यांचे फोटो नव्हते, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.
जर कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर धुळे जिल्ह्यात काँग्रेससाठी हा मोठा धक्का ठरेल, असं मत स्थानिक राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
पाटील काय म्हणाले?
या कार्यक्रमात बोलताना कुणाल पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं. ते म्हणाले, "होय, मी निवडणुकीत पराभूत झालो, पण तरीही 1 लाख मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला. आजही लोक माझ्याबद्दल तेवढ्याच आपुलकीने बोलतात. जर मी 2029 मध्ये निवडणूक लढवली, तर 2 लाख मतांनी विजयी होईन असा विश्वास आहे."
"आज इथे उपस्थित असलेले कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. त्यांच्याशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेईन. उद्या मी भाजप किंवा राष्ट्रवादीमध्ये गेलो, तरी माझा सन्मान कमी होणार नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेईन. तो निर्णय तुमच्याशी बोलूनच घेईन," असं वक्तव्य त्यांनी केलं.
राजकीय भविष्य स्पष्ट नाही, पण संकेत स्पष्ट
पाटील यांनी थेट पक्षांतर जाहीर केलेलं नसून, भविष्यकालीन शक्यता उघड्या ठेवल्या आहेत. मात्र त्यांच्या बोलण्यातून आणि कार्यक्रमात काँग्रेसचा गैरहजेरीतून बदलाची चाहूल लागल्याचं स्पष्ट होतं आहे.












Click it and Unblock the Notifications