कन्नडमध्ये उदयसिंग राजपूत यांच्या विरोधात कोण? संजना जाधव, नितीन पाटील की हर्षवर्धन जाधव वाचा
Kannad Assembly Elections 2024 : नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष, कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघात इच्छुकांनी मीच उमेदवार म्हणून प्रचारही सुरू केला आहे.
या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत हेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे. दरम्यान, त्यांच्या विरोधात महायुतीकडून अनेकांनी तयारी सुरू केली आहे. मात्र, महायुतीत हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जातो यावर सगळे काही ठरणार आहे.

आमदार उदयसिंग राजपूत यांना शह देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने भरतसिंग राजपूत यांची जिल्हाप्रमुखपदी निवड केली आहे. भरतसिंग राजपूत व केतन काजे हे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. यासोबतच, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यासुद्धा या मतदारसंघात भाजपकडून तयारी करीत आहेत.
महायुतीत हा मतदारसंघ शिंदे गटाच्या वाट्याला गेला तर जाधव या शिंदे गटात प्रवेश घेऊ शकतात असा अंदाज आहे. महायुतीकडून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, तालुकाप्रमुख केतन काजे, बाजार समितीचे सभापती डॉ. मनोज राठोड आणि केशव राठोड हे इच्छुक उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. सीताराम जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव अपक्ष म्हणून तयारीला लागले आहेत.
नितीन पाटील यांचीही तयारी
माजी आमदार नितीन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी उमेदवारीच्या अपेक्षेने हा निर्णय घेतला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतोष कोल्हे आणि स्वाती कोल्हे यांनी नितीन पाटील यांच्यासमोर पक्षांतर्गत आव्हान उभे केले आहे. काँग्रेसकडून माजी आमदार नामदेव पवार देखील निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला ही जागा मिळणार असल्याचे जवळजवळ निश्चित आहे आणि विद्यमान आमदार राजपूत पुन्हा एकदा मैदानात असणार आहेत.
गतवेळी काय झाले होते?
कन्नड विधानसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे राजपूत यांनी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचा 18 हजार 690 मतांनी पराभव करून विजय मिळवला होता.

मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे लक्ष
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीच्या काळात एक महत्त्वाचा घटक बनले आहेत. ते निवडणुकीत कोणती भूमिका घेणार, हे सर्व पक्षांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. जरांगे यांच्या राजकीय भूमिकेवर या मतदारसंघांतील निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
या आहेत समस्या
या मतदारसंघात अनेक विकासकामे झाली असल्याचा दावा केला जात आहे. परंतु ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक गावांमध्ये पाणी पुरवठा योजना नाही. वन्य प्राण्यांचे हल्ले ही मोठी समस्या आहे. औट्रोम घाटातील वाहतूक कोंडी कधी सुटणार हे कोडेच आहे.












Click it and Unblock the Notifications