मी मुंबईत येतोय, ठाकरे बंधू तुमची औकात असेल तर मला हात लावून दाखवा; काली सेनेच्या अध्यक्षांचा इशारा
हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्याने आता मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण झाला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठीच्या मुद्यावर मीरा रोड येथे एका परप्रांतीय दुकानदाराला मारहाण केली होती. त्यानंतर कडियोनोमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचणारे विधान केले. या घटनाक्रमामुळे वातावरण तापलेले आहे.
अशातच, आता काली सेनेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरुप यांनी ठाकरे बंधूंना आपल्याला हात लावून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. ठाकरे बंधू मी मुंबईत येतोय. औकात असेल तर मला हात लावून दाखवा. तुमचा हात तोडला नाही तर पाहा, असे त्यांनी म्हटले आहे.

स्वामी आनंद स्वरुप यांनी एका व्हिडिओ पोस्टद्वारे म्हटले आहे की, महाराष्ट्रात राका व साका अर्थात राज व उद्धव ठाकरे हे जे दोन भाऊ आहेत. त्यांच्या छोट्या छोट्या गँग आहेत. ते आता सत्तेपासून खूप दूर आहेत. अजाण ही अरबीत नव्हे तर मराठीत द्या असे मुस्लिमांना सांगण्याची त्यांच्यात हिंमत आहे का? त्यांची औकात आहे का मुस्लिमांवर बोलण्याची?
साधेभोळे मजूर 2 हजार किलोमीटरवरून मुंबई, महाराष्ट्रात येऊन आपली उपजिविका चालवत आहेत. त्यांना एकटे गाठून मारले जात आहे. त्यांचा छळ केला जात आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे व संजय राऊत माझे तुम्हाला खुले आव्हान आहे. मी लवकरच मुंबईत येईल. तिथे उभे राहून हिंदीत बोलेन. मला कोण थांबवतो ते पाहतो. तुमची औकात असेल तर मला हात लावून दाखवा. तुमचा हात शरीरापासून वेगळा केला नाही तर माझे नाव बदला.
तुमच्या खासदाराचे तोंड काळे केले जाईल
माझ्या लोकांवर हात उचलता. माझ्या लोकांना मारता. भाषेच्या आधारावर देशाची फाळणी करता. आमच्यासाठी तमिळ, कन्नड, मल्याळम, हिंदी, भोजपुरी, मराठी आदी भारतात बोलल्या जाणाऱ्या सर्वच भाषा महत्त्वाच्या आहेत. या सर्व भाषा मिळूनच भारत बनतो. तुम्ही कुणावरही काही लादू शकत नाही. अन्यथा उद्या तुमचे खासदार दिल्लीत आले तर त्यांना पकडून त्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांचे स्वागत केले जाईल. त्यांच्या कानशिलात हाणली जाईल, असे ते म्हणाले.
सुशील केडियांनी केले होते वादग्रस्त ट्विट
स्वामी आनंद स्वरुप यांच्या या पोस्टमुळे महाराष्ट्रातील वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे सुप्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांनी परवा एका ट्विटद्वारे राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मी मागील 30 वर्षांपासून मुंबईत राहतो. त्यानंतरही मला मराठी भाषा फारशी कळत नाही. पण तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात, ते पाहता तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. राज ठाकरे काय करावे लागेल बोल? असे सुशील केडिया यांनी म्हटले होते. केडिया यांनी आपले हे ट्विट थेट राज ठाकरे यांनाही टॅग केले आहे.
महाराष्ट्रात बाराखडी शिकावीच लागणार -मनसे
दुसरीकडे, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना जे बाराखडी शिकणार नाहीत, त्यांचे बारा वाजणार असल्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात मराठी शिकावीच लागेल. हिंदी भैय्यांनी आम्हाला शिकवू नकये. मराठीचा अपमान करणाऱ्यांवर एक तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी किंवा आम्ही त्यांच्यावर आमच्या पद्धतीने कारवाई करू, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
दरम्यान, आज मुंबईच्या वरळी डोम येथे ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून राज व उद्धव ठाकरे तब्बल 18 वर्षांनंतर एका मंचावर येणार आहेत. यावेळी या दोन्ही बंधूंचे मनोमिलन झाल्यानंतर त्यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
विजयी मेळावा का घेण्यात आला?
मनसे व ठाकरे गटाचा विजयी मेळावा आज वरळी येथील NSCI डोम येथे आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा आयोजित करण्याचे प्रमुख कारण म्हणजे राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राअंतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा सक्तीचा निर्णय मागे घेतला आहे. या निर्णयाविरोधात मनसे व ठाकरे गटाने एकत्र येऊन आंदोलनाची तयारी केली होती. यामुळे सरकारला हा निर्णय रद्द करावा लागला. या यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आणि मराठी भाषा व संस्कृतीच्या रक्षणासाठी एकजुटीचे प्रदर्शन करण्यासाठी हा विजयी मेळावा घेण्यात येत आहे. हा मेळावा मराठी माणसांच्या एकजुटीचे आणि मराठी अस्मितेचे प्रतीक मानले जात आहे. पण यामागे आगामी महानगरपालिका निवडणुकांचे गणित असल्याचाही दावा केला जात आहे.












Click it and Unblock the Notifications