"राज्याचा खेळखंडोबा, भाजपच्या नादाला लागून 'या' मंत्र्यांचं लाज वाटेल असं कृत्य"- 'या' नेत्याची टीका
मालवन इथल्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर आता राज्यात टीका-टीप्पणी आणि राजकारण सुरु आहे. यातच काल राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपसह राज्याताली सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर जोरदार टीका केली. यात त्यांनी नाव घेतले नसले तरीही त्यांचा रोख केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे होता.
राजकोट किल्ल्यावर काल महाविकास आघाडीचे काही नेते यामध्ये विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे हे पाहणीसाठी आले होते. तर दुसरीकडे महायुतीतील नारायण राणे आणि त्यांचे पुत्र राजकोट किल्ल्यावर आले होते. यादरम्यान दोन्ही गटातील कार्यकर्त्यांत राडा झाला. यानंतर नारायण राणेंकडून महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना धमकी देण्यात आली. यावरुन आता राज्याचे राजकारण पुन्हा तापले आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?
जितेंद्र आव्हाड म्हणाले, "घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन" ही भाषा आहे माजी केंद्रीय मंत्र्यांची ! तीही कोणासाठी, तर राजकोट किल्ल्यावर जमलेल्या शिवप्रेमींसाठी..! एक तर भ्रष्टाचार करायचा, आणि त्यातून नुकसान झालं, तो उघड झाला की ही गुंडगिरी करायची. भाजपच्या नादाला लागलेल्या या मंत्र्यांनी कोकणासह महाराष्ट्रातील तमाम मराठी लोकांनाही लाज वाटेल असं आज कृत्य केलंय."

(जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट)
खेळखंडोबा केलाय..
जितेंद्र आव्हाड म्हणाले,"पक्षाला वाचवायच्या नादात यांची गुंडगिरी एवढी वाढलीये की राज्यातील नेत्यांनाही धमकावण्यापर्यंत यांची मजल गेलीये. बरं आता यांना वाचवायला कायदा आणि सुव्यवस्था डोळे झाकून राहणार यात काही नवल नाही.राज्याचा खेळखंडोबा करून ठेवलाय..!"
काल काय घडला प्रकार?
आदित्य ठाकरे ज्यावेळी राजकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आले त्यावेळी नारायण राणे समर्थकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या समर्थकांनीही प्रत्युत्तरादाखल घोषणाबाजी केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. यामुळे किल्ल्यावर प्रचंड तणाव निर्माण झाला. या स्थितीतच आदित्य ठाकरे यांनी किल्ल्यावर जाऊन स्थितीची पाहणी केली. यावेळी नीलेश राणे यांनी पोलिसांविरोधात चांगलीच आक्रमक भूमिका घेतली.
नारायण राणेंनी काय दिली होती धमकी?
नारायण राणे यांनीही यावेळी आक्रमक भूमिका घेत आम्ही या भागातील आहोत. बाहेरचे येथे येऊन दादागिरी करत असतील आणि पोलिस त्यांना संरक्षण देणार असतील तर आम्ही येथून अजिबात हलणार नाही. काय करायचे ते करा. आम्हाला गोळ्या घाला. असले आंडू-पांडू आम्ही खूप पाहिले. त्यानंतर मविआच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून ठार मारु असे म्हणत पोलिसांसमोर राणे नारायण यांनी धमकावले.












Click it and Unblock the Notifications