जयंत पाटील यांनी सांगितली विधानसभा निवडणुकीची तारीख
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीचा धुरळा अद्याप खाली बसलेला नाही. निवडणुकीत लागलेल्या निकालांच्या धक्क्याचे पडसाद अजूनही विविध लोकसभा मतदारसंघात चांगलेच बसत आहेत. तोपर्यत विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत.

महाविकास आघाडीचा आत्मविश्वास अधिक वाढला असून महायुतीत कुरबुरी दिसून येत आहेत. राज्यात नव्या समीकरणांची मांडणी करण्याची देखील चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलता बोलता विधानसभा निवडणुकांची तारीख देखील जाहीर करून टाकलीय.
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक शक्तिमान ठरला तो शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस. अवघ्या 10 जागा लढवून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने तब्बल 8 जागा जिंकल्या.शरद पवारांच्या नवख्या राष्ट्रवादीने तशा नवख्या उमेदवारांना घेऊन भाजपच्या भल्या भल्या उमेदवारांना असमान दाखवले.त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे राजकीय वजन देखील चांगलेच वाढले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भविष्यातील राजकीय स्थितीविषयी भाष्य केले. लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे sharad पवार याच्या राष्ट्रवादी पक्षाकडे तरुणांचा कल अधिक वाढला आहे. तरुणांना घेऊनच पुढे वाटचाल केली जाणार आहे असे जयंत पाटील म्हणालेत. पिपाणी आणि तुतारी चिन्हामुळे आम्हाला फटका बसला. या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे जात आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
विधानसभा निवडणूक पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आपला नेता ठरवतील. विधानसभा निवडणूक लक्षात घेता महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा लवकरच पूर्ण केली जाईल आणि त्यासाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक लवकरच घेण्यात येईल. पूर्वनियोजित बैठक काही कारणामुळे होऊ शकली नाही, ती लवकरच घेण्यात येईल, असे ते म्हणाले. इतर पक्षांची भूमिका ऐकून घेऊन निर्णय घेण्यात येईल अशी माहिती देखील त्यांनी दिली.
मुख्यमंत्री कोण होणार याकडे महाविकास आघाडीच्या लोकांनी लक्ष देऊ नये. राज्य समोर सध्या अनेक आव्हाने आहेत. आपल्या देशासमोर 210 लाख कोटींचे कर्ज आहे. त्याची भरपाई न झाल्यास देशावर श्रीलंकेसारखी स्थिती उद्भवू शकते. तशी परिस्थिती येऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या आमदारांना सध्या काहीही काम उरलेले नाही. कामाची घोषणा करायची, टेंडर काढायचे आणि कमिशन घ्यायचे हा एकच उद्योग त्यांच्यासमोर उरला आहे, असे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान बोलता बोलता जयंत पाटील यांनी आगामी विधानसभेची तारीख देखील जाहीर करून टाकली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका 20 ऑक्टोबरला घेण्यात येतील, असे भाकीत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.












Click it and Unblock the Notifications