राज ठाकरेंना एकाच दिवशी तीन धक्के! माजी आमदाराचा 10 दिवसांतच 'रामराम'; एकनाथ शिंदेंची सरशी!
MNS Setback Maharashtra : राज्यभरातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा रणसंग्राम शेवटच्या टप्प्प्यात पोहोचला आहे. अशातच, नाशिकच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानापूर्वीच राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून, फोडाफोडीच्या राजकारणाने जोर धरला आहे.
नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) मोठा धक्का बसला असून, भारतीय जनता पक्षातील (BJP) अंतर्गत नाराजीचा फायदा घेत उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने बाजी मारलीय.

मनसेला भगदाड: धुरींचा भाजपात, प्रवक्त्यांचा शिवसेनेत प्रवेश!
मनसेचे माजी नगरसेवक आणि आक्रमक नेते संतोष धुरी यांनी राज ठाकरे यांची साथ सोडून भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर अत्यंत बोचरी टीका केली. "राज ठाकरेंनी आपला पक्षच शिवसेना (ठाकरे गट) स्वाधीन केला आहे," असा गंभीर आरोप करत त्यांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' केला. तसेच, संतोष धुरी यांच्यापाठोपाठ मनसेला आणखी दोन मोठे धक्के बसले आहेत. हेमंत कांबळे (प्रवक्ता, मनसे) यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. तसेच, राजा चौगुले (सरचिटणीस, मनसे) यांनीही एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतला. एकाच दिवशी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी साथ सोडल्याने नाशिकमध्ये मनसेची ताकद क्षीण होताना दिसत आहे.
माजी आमदार भोसले यांचा 'टर्निंंग पॉईंट'
या सर्व घडामोडींत सर्वाधिक चर्चा आहे ती माजी आमदार नितीन भोसले यांची. त्यांच्या पक्षबदलाचा वेग पाहून राजकीय विश्लेषकही अवाक झाले आहेत. नितीन भोसले हे मूळचे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. २५ डिसेंबर २०२५ अवघ्या १० दिवसांपूर्वी त्यांनी मोठा गाजावाजा करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, भाजपने महापालिका निवडणुकीत त्यांच्या भावजयीला (प्रभाग क्रमांक १३ मधून) तिकीट नाकारल्याने, भोसले यांनी १० दिवसांतच भाजपला सोडचिठी देत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी भाजप कार्यालयात मोठा राडा झाला होता आणि कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना घेराव घातल्याने तणाव निर्माण झाला होता.
महायुतीतील 'छुप्या युद्धा'चे पडसाद
नाशिक महापालिकेत भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेची युती असली, तरी जागावाटपावरून आणि तिकीट वाटपावरून दोन्ही पक्षांत मोठी स्पर्धा आहे. महायुतीचे ७० उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. भाजप आणि शिवसेना एकमेकांचे मित्र पक्ष असले, तरी इतर पक्षातील नेते आपल्याच पक्षात कसे येतील, यासाठी दोन्ही बाजूंकडून चढाओढ सुरू आहे. नितीन भोसले यांच्यासोबतच नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ आणि काँग्रेस नेते शाहू खैरे यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याने शिंदे गटाची बाजू वरचढ ठरताना दिसत आहे.
नाशिकची निवडणूक का महत्त्वाची?
नाशिक महापालिका ही नेहमीच मनसे आणि शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेली आहे. मात्र, यंदा भाजपने आपली ताकद लावल्याने आणि शिंदेंच्या शिवसेनेने आक्रमक 'इनकमिंग' केल्याने ही निवडणूक चौरंगी किंवा पंचरंगी होण्याऐवजी महायुती विरुद्ध इतर अशी होण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications