टिपू सुलतानची तुलना शिवाजी महाराजांशी; काँग्रेस नेते सपकाळांच्या विधानाने महाराष्ट्रात संतापाची लाट
Harshvardhan Sapkal statement on Tipu Sultan : महाराष्ट्राच्या राजकारणात सद्या महापुरुषांमध्ये केल्या जात असलेल्या तुलनेवरुन नवा आणि अत्यंत स्फोटक वाद निर्माण झालेला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका करत हर्षवर्धन सपकाळांनी जाहीर माफी मागावी, अशी थेट मागणी केली आहे.

नेमके वादग्रस्त विधान काय?
बुलढाणा येथे माध्यमांशी बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मालेगावमधील टिपू सुलतानच्या फोटोवरून सुरू असलेल्या वादावर भाष्य केले. ते म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारचे शौर्य दाखवले आणि स्वराज्याचा विचार दिला, त्याच समकक्ष काम टिपू सुलतान यांनी केले आहे. (Harshvardhan Sapkal Says Tipu Sultan Equal To Chhatrapati Shivaji Maharaj) टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला, ते भारताचे भूमिपुत्र होते. शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांच्याकडे शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहिले पाहिजे."
सपकाळ यांच्या या विधानामुळे शिवप्रेमी आणि राजकीय विरोधकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना इतर कोणाशीही करणे महाराष्ट्राला मान्य नाही, अशी भावना जनमानसातून उमटत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांचा कडाडून प्रहार
सपकाळ यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "हर्षवर्धन सपकाळ यांना अशा प्रकारची तुलना करताना लाज वाटली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्याचे नाही तर राष्ट्राचे दैवत आहेत. त्यांची तुलना टिपू सुलतानशी करणे हा महाराजांचा अपमान आहे. सपकाळ यांनी तात्काळ माफी मागावी."
सरकारवरही डागली तोफ: "हे सरकारच लाचखोर"
केवळ ऐतिहासिक विषयावरच नव्हे, तर सपकाळ यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवरही विखारी टीका केली. ते म्हणाले की, नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाचखोरीच्या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, "हे सरकारच लाचखोर आहे. ५० हजारांची लाच हे छोटे प्रकरण आहे, पण कोट्यवधी रुपये खाणाऱ्यांवर काय कारवाई करणार?"
अजित पवारांच्या निधनानंतरची स्थिती
अजित पवारांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांनी विचारले की, हा पक्ष आता कोणाच्या विचाराने चालणार? "पटेल यांचा 'तो मी नव्हेच' म्हणण्याचा स्वभाव जुना आहे," असा टोलाही त्यांनी लगावला.
शेतकरी प्रश्नावरून केंद्र सरकारवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना सपकाळ यांनी अत्यंत खालची पातळी गाठली. "पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांच्या गळ्यात फास लावल्यावरच शांत बसतील," असे विधान त्यांनी केले. अमेरिकेसोबतच्या करारामुळे शेतकऱ्यांचा कोणताही फायदा होणार नाही आणि केंद्रीय पथकाची पाहणी म्हणजे 'वरातीमागून घोडे' असल्याचे त्यांनी म्हटले.
राजकीय विश्लेषण: वादाचे पडसाद
हर्षवर्धन सपकाळ यांच्या या एका विधानामुळे काँग्रेस बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलनेमुळे आगामी निवडणुकांमध्ये महायुती या मुद्द्याचे भांडवल करू शकते. टिपू सुलतान यांच्या ऐतिहासिक भूमिकेवरून आधीच समाजात दोन गट असताना, ही तुलना आगीत तेल ओतण्याचे काम करणारी ठरेल.












Click it and Unblock the Notifications