मोठी बातमी..! 26/11 खटल्यातील न्यायमूर्ती करणार संतोष देशमुख हत्येची चौकशी; सरकारचं मोठं पाऊल
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण व परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण सध्या राज्यात चांगलंच चर्चेत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी, एसआयटी यांच्याकडे आहे. सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशीही सुरु आहे. मात्र आता राज्य सरकारने या दोन्ही प्रकरणात मोठं पाऊल उचललं आहे. या दोन्ही प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने दोन स्वतंत्र माजी न्यायमूर्तींची नियुक्ती केली असून, हे दोन्ही न्यायमूर्ती सहा महिन्यांत आपला अहवाल सादर करणार आहेत.

ताहलियानी यांची नियुक्ती
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने न्यायालयीन एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यातील कसाबला फाशी दिल्याच्या प्रकरणातील न्यायाधिश एम. एल. ताहलियानी यांची त्यात नियुक्ती करण्यात आली आहे. न्या. ताहलियानी हे आपला अहवाल सरकारला सहा महिन्यांत सादर करणार आहेत. सरकारने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे समजले जात आहे.
आचलिया यांची नियुक्ती
परभणी हिंसाचारावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला होता. आता याच प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी सरकारने न्यायालयिन समिती स्थापन केली आहे. निवृत्त न्यायाधिश व्ही. एल. आचलिया यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. आचलिया हेही सहा महिन्यांत आपला अहवाल सरकारला सादर करणार आहेत.
कुणाचीही होणार चौकशी
सेवानिवृत्त न्यायाधिश एम. एल. ताहलियानी यांच्या चौकशी समितीचे मुख्यालय हे बीड येथे असणार आहे. या समितीला चौकशीसाठी कोणत्याही व्यक्तीला बोलावण्याचा तसेच कागदपत्रे जप्त करण्याचा, झडतीचा अधिकार राहणार आहे. सहा महिन्याच्या आत समितीने आपला अहवाल सरकारला सादर करायचा आहे. तसेच व्ही. एल. आचलिया यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती परभणीतील हिंसाचार आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील घडलेल्या घटनांचा क्रम, त्याची कारणे आणि परिणाम याचा अभ्यास करणार आहे.












Click it and Unblock the Notifications