स्वामी गोविंदगिरी महाराज म्हणाले- छत्रपती शिवाजी महाराज ED प्रमाणे लोकांकडून सक्तीची वसुली करत
Govinddev Giri Maharaj On Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळात वेळप्रसंगी ईडी प्रमाणे लोकांकडून सक्तीची वसुली करत असत, असे वक्तव्य अयोध्येतील राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी केले. त्यांच्या या विधानानंतर आता सुरत लुटीच्या वादाला अधिक खतपाणी भेटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्यानंतर राज्यात टीकेच्या राजकारणाने जोर धरला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांना पळता भुई थोडी पाडली. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराजांनी सुरत लूटीचा मुद्दा उपस्थित करून नवीन वाद उभा केला. त्यावरुन पुन्हा राजकारण तापलेलं पाहायला मिळाले. आता याच वादात स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी एक विधान केल्याने राज्यात वादाची ठिणगी पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राजकीय वर्तुळात तशा चर्चा देखील रंगल्या आहेत.

काय म्हणाले गोविंददेव गिरी महाराज?
गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण राज्य हिंदूंचे आहे असे मानून राज्य करत होते. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेवेळी महाराजांना आर्थिक चणचण भासत होती. त्या स्थितीत जेव्हा त्यांना कोणताही उपाय दिसत नसे, तेव्हा ते आज ज्या प्रकारे ईडी सक्तीची वसुली करते, त्याच प्रकारे ते त्याकाळी काही लोकांकडून सक्तीची वसुली करत होते. हिंदी स्वराज्यासाठी जो कर भरायला हवा होता, त्याची वसुली महाराज सक्तीने करत होते.
महाराजांच्या विधानाने नवा वादाला तोंड
गोविंददेव गिरी महाराजांच्या अशा विधानामुळे शिवाजी महाराजांच्या सुरत लुटीच्या वादाला नवीन पालवी फुटणार असल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष असलेले गोविंददेव गिरी महाराज हे त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे कायमच चर्चेत असतात. मंदिर उद्घाटनाच्या वेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. त्यावेळी विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होतीय
फडणवीसांचा नेमका दावा काय?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नाही असा दावा केला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली हे म्हणणे चुकीचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरतेवर दोनदा स्वारी केली. अल्लाउद्दीन खिलजी जे करतो त्याला लूट म्हणतात. अब्दाली, तैमूर यांनी जे केले त्याला लूट म्हणतात. महाराजांनी तिथल्या सामान्य माणसांना हात तरी लावला होता का?, त्यांच्या या विधानावर अनेक इतिहासकारांनी आक्षेप घेतला होता.












Click it and Unblock the Notifications