शेठजी-भटजींचा पक्ष गावखेड्यापर्यंत नेणारे लोकनेते गोपिनाथराव मुंडेंची पुण्यतिथी, वाचा त्यांचा संघर्ष
Gopinath Munde Death Anniversary 2025 : भाजपचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज 11 वी पुण्यतिथी (3 जून 2025) आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथ्रा गावात जन्म झालेल्या गोपिनाथ मुडे यांचा राजकीय प्रवास अतिशय संघर्षमय राहिला. कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ आपल्या अमोघ वाणीने आणि प्रचंड इच्छाशक्ती व जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी राजकारणात सर्वोच्च स्थान निर्माण केले.
जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. सत्तेपेक्षा विरोधी बाकावर बसून जनतेसाठी कित्येक वर्ष त्यांनी संघर्ष केला. ऊसतोडी करणाऱ्या बीड जिल्ह्याचा कायापालट त्यांनी केला. शेठजी-भटजी यांचा असलेला भाजप पक्ष केवळ मोठ्या शहरांमध्ये वसलेला हा पक्ष खऱ्या अर्थाने तळागळापर्यंत गाव खेड्यापर्यंत नेण्याचे काम गोपिनाथराव मुंडे यांनी केले.
गोपिनाथराव मुंडे यांच्या जीवनाविषयी पर्यायी नाव जर म्हटले तर संघर्ष असेच लोकांच्या डोळ्यासमोर येते. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. चला तर त्यांच्या जीवनकार्याविषयी जाणून घेऊया...त्यांचे स्मरण करूया..!
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडेंनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. खेडोपाडी जात सर्वांना एकत्र करत भाजप पक्षाची ताकद वाढवली, स्व. प्रमोद महाजन आणि गोपिनाथराव मुंडे यांची जोडी म्हणजे राजकारणातील राम-लक्ष्मणाची जोडी म्हटले जात. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे एव्हाना देशाच्या राजकारणाचे मोठे नुकसान झाले आहे, हे देखील तितकेच सत्य आहे.

जन्म, शिक्षण आणि राजकारणाची कशी झाली सुरुवात
गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांचा जन्म 12 डिसेंबर 1949 रोजी बीड जिल्ह्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. गोपीनाथ मुंडेच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती.
गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत गोपीनाथ मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर बीडच्याच अंबाजोगाई येथील महाविद्यालयाच बी. कॉम. पर्यंतचे शिक्षण झाले.
बीडच्या कॉलेजमध्ये विद्यार्थी संसदेच्या निवडणुका लढवल्या. पुढे नाथ्रा या गावचे ते सरपंच झाले आणि इथूनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली.
जि.प. सदस्य ते खासदार-मंत्री असा प्रवास
1978 मध्ये अंबाजोगाई तालुक्यातील उजनी गटातून गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरले. तर, रेणापूर विधानसभा मतदारसंघातून 1980 मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले. या काळातच त्यांच्याकडे भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष आणि त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पदही होते.
1985 मध्ये त्यांचा पराभव झाला. मात्र, यानंतर 1990 ते 2009 मध्येदेखील रेणापूर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले. रेणापूर विधानसभा मतदारसंघ 2009 साली विसर्जित करून याचा बहुतांश भाग परळी विधानसभा मतदारसंघात विलीन करण्यात आला.
यानंतर 2009 मध्ये गोपीनाथ मुंडे बीड लोकसभा निवडणूक लढवत त्यांनी दिल्ली गाढली. यानंतर 2014 मध्ये पुन्हा ते खासदार म्हणून निवडून आले.

शरद पवारांविरोधात उगारला होता एल्गार
गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय प्रवासाचा विचार केला तर 1990 ते 1995 हा त्यांच्या जीवनातील सर्वोत्तम काळ मानला जात होता. याच कार्यकाळात त्यांच्याकडे राज्याचे विरोधी पक्षनेतेपद होते. या कार्यकाळात त्यांनी शरद पवार यांच्याविरोधात रान पेटवलं.
गुन्हेगारी विषयावरुन त्यांनी महाराष्ट्र सरकारला घेरलं. यावेळी गोवारी हत्याकांड, वडराई प्रकरण, जळगावचे एक प्रकरणासह पप्पू कलानी यांच्यासह अनेक प्रकरणे उघडी केली.
याच गोष्टीमुळे 1995 मध्ये युतीचे सरकार येताच त्यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदासह गृहमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यावेळी मुंबईतील गॅंगवारचा सफाया करण्यात त्यांचा मोठा हात होता, असेही म्हटले जाते.

भाजप अन् शिवसेना युतीचा दुवा
राज्यात भाजप आणि शिवसेना युती प्रमोद महाजन यांच्यानंतर जपण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले. दोन्ही पक्षामध्ये तणाव निर्माण झाला, तर ते शांत करण्याचे काम मुंडे करत असताना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे.
गोपीनाथ मुंडे यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अत्यंत चांगले आणि कौटुंबिक संबंध होते. ते बाळासाहेबांचा कुठलाही शब्द पडू द्यायचे नाहीत. मुंडे यांच्या याच स्वभावामुळे त्यांनी युतीसोबत रामदास आठवले, महादेव जानकर, राजू शेट्टी यांना सोबत घेत युतीची महायुती केली होती. तसेच ती दिर्घकाळ टिकवली देखील होती.
फडणवीसांसाठी लावली होती ताकद
सद्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा राजकारणात प्रवेश केला तेव्हा त्यांना प्रमोद महाजन तसेच गोपीनाथ मुंडेंनी मोठी साथ दिली.
या दोन्ही नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत कमी वयात आमदारकीचं तिकीट देण्यापासून ते पुढे राज्याच्या राजकारणात मोठं स्थान देण्यापर्यंत प्रयत्न केले.
2013 साली महाराष्ट्र भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. यावेळी नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे असे भाजपमध्ये दोन गट निर्माण झालेले होते. दोघांनाही आपल्या गटाचा प्रदेशाध्यक्ष व्हावा असे वाटत होते. यासाठी दोन्ही नेत्यांनी प्रयत्न सुरू केले.
गडकरी यांच्या गटाचा सुधीर मुनगंटीवार यांना तर मुंडेंच्या गटाचा फडणवीसांना पाठिंबा होता. यावेळी आक्रमकपणे भाजपची बाजू मांडणारे फडणवीस यांच्या पाठिशी मुंडेंनी आपली ताकद लावली, अन् देवेंद्र फडणवीस हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले. अन् त्यानंतर 2014 मध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
मुंडेंचा बालेकिल्ला बीड अशी होती ओळख
बीड जिल्हा हा मुंडेंचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे ठरवतील ते होते असे मानले जायचे. एकेकाळी बीड जिल्ह्यासाठी मुंडे म्हणतील ती पूर्व दिशा होती. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, पतसंस्था, बाजार समित्या, जिल्हा बँक, नगरपालिका आदी सत्तास्थानांवर खासदार मुंडेंचा प्रभाव होता. जिल्ह्यात प्रबळ विरोधक कोणीच नसल्यामुळे सर्व जाती-धर्मांच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून त्यांनी राजकीय वैभव प्राप्त केले होते.
गोपिनाथराव मुंडे यांचा संक्षिप्त परिचय, कसा राहिला संपूर्ण जीवनाचा प्रवास...
कोण कोणती पदं भूषविली....
अध्यक्ष : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्था, जिल्हा पुणे,जिल्हा मुंबई
अध्यक्ष : अथर्व शिक्षण संस्था, जिल्हा मुंबई
अध्यक्ष : वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, जिल्हा बीड
अध्यक्ष : सोमनाथ नागनाथअप्पा हालगे शिक्षण संस्था, परळी जिल्हा बीड
अध्यक्ष : जवाहर शिक्षण संस्था, परळी जिल्हा बीड
अध्यक्ष : मल्लवाबाई वल्ल्याळ डेंटल कॉलेज, जिल्हा सोलापूर
संस्थाध्यक्ष : संत जगमित्र नागा सुतगिरणी, परळी जिल्हा बीड
राजकीय प्रवास कसा झाला सुरू..
- इ.स. १९६९ : बीडच्या कॉलेजमध्ये विद्यार्थीसंसदेच्या पहिल्या वर्षी वर्गप्रतिनिधीची(सीआर) निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
- इ.स. १९७० : परळीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अ. भा. वि. प.) काम
- इ.स. १९७८ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत पराभव
- इ.स. १९७८ : बीड जिल्हापरिषद निवडणुकीत रेणापूर (उजनी) मतदारसंघातून राज्यभरात सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी
- इ.स. १९८० : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९८० ते इ.स. १९८५)
- इ.स. १९८० : महाराष्ट्र राज्य भारतीय जनता युवा मोर्चाचे पहिले अध्यक्ष
- इ.स. १९८२ : महाराष्ट्र राज्य भाजपचे सरचिटणीस
- इ.स. १९८५ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर(गेवराई) मतदारसंघातून पराभव.
- इ.स. १९८४ : बीड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत पराभव
- इ.स. १९८६ : महाराष्ट्र राज्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष
- इ.स. १९८७ : कर्जमुक्ती मोर्चा: महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोठा मोर्चा काढून शासनास कर्जमुक्ती करण्यास भाग पाडले.
- इ.स. १९९० : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९९० ते इ.स. १९९५)
- इ.स. १९९२, १२ डिसेंबर : महाराष्ट्र राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद. (इ.स. १९९२ ते इ.स. १९९५)
- इ.स. १९९२ : संघर्ष मोर्चा: महाराष्ट्रात राजकारणाच्या गुन्हेगारीकरण विरोधात शिवनेरी ते शिवतीर्थ अशी संघर्ष यात्रा काढली.
- इ.स. १९९५ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९९५ते इ.स. १९९९)
- इ.स. १९९५,१४ मार्च : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ (इ.स. १९९५ ते इ.स. १९९९)
- इ.स. १९९५,१४ मार्च : महाराष्ट्राचे ऊर्जा व गृहखात्यांचे मंत्री म्हणून शपथ (इ.स. १९९५ ते इ.स. १९९९)
- इ.स. १९९९ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९९९ ते इ.स. २००४)
- इ.स. २००४ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले (इ.स. २००४ ते इ.स. २००९)
- इ.स. २००९ : बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले (इ.स. २००९ ते इ.स. २०१४)
- इ.स. २००९,११ जुलै : महाराष्ट्र राज्य भाजपचे प्रभारी म्हणून नेमणूक
- इ.स. २००९ : लोकसभेतील भाजपचे उपनेते म्हणून नेमणूक
- इ.स. २०१० : जनगणनेत ओबीसींची वेगळी नोंद करावी अशी मागणी लोकसभेतील भाजप उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.
- इ.स. २०११, १४ मार्च : माफिया राज हटवा मोर्चा: भाजपतर्फे मुंबईत काढण्यात येणाऱ्या माफिया राज हटवा मोर्चा जनजागरण अभियानचे नेतृत्व
- इ.स. २०११, ०३ ऑक्टोबर : निर्धार मोर्चा: बीडमध्ये ऊसतोडणी वाढवून मिळवुनसाठी निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला.
- इ.स. २०११ : जनलोकपाल विधेयकावर अण्णांना पाठिंबा
- इ.स. २०१२ : गोवा विधानसभा निवडणूक २०१२ च्या प्रचारासाठी गोव्यात पाठविले
- इ.स. २०१२ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१२ च्या प्रचारासाठी भाजपतर्फे 'स्टार प्रचारक' करण्यात आले आहे.
- इ.स. २०१२, २७ जून : संयुक्त राष्ट्राच्या ६५ व्या सर्वसाधारण सभेत आंतरराष्ट्रीय कायदा आयोग या विषयावर न्यू यॉर्क येथे भारत सरकारचे प्रतिनिधित्व.
- इ.स. २०१२ : महाराष्ट्राच्या राज्यात दुष्काळी ठिकाणी दौऱ्यावर निघाले.
- इ.स. २०१३ : भाजपचे केंद्रीय निवडणूक समितीत समावेश
- इ.स. २०१४ : खासदार म्हणून लोकसभेत निवडून आले. केंद्रीय मंत्री म्हणून मोदी मंत्रीमंडळात निवड.
- इ.स. २०१४ : ३ जून २०१४ रोजी नवी दिल्ली येथे रस्ते अपघातात निधन.












Click it and Unblock the Notifications