गौतम अदानींनी तातडीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट; कारण काय, चर्चा रंगल्या
महायुती सरकार स्थापन होऊन, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली. आता नवीन मंत्रीमंडळाची चर्चा रंगली असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन घटना घडली. प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी आज अचानक मुख्मयंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही तातडीची भेट नेमकी कशासाठी होती, याबाबत आता चर्चा रंगल्या आहेत.

अदानी पोहोचले सागर बंगल्यावर
आज दुपारी अचानक गौतम अदानी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचले. त्यावेळी फडणवीस बंगल्यावरच होते. या दोघांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. अदानींनी एवढ्या तातडीने फडणवीसांची भेट का घेतली, याबाबत मात्र तर्कवितर्क लढविले जात आहेत. अदानी यांनी राज्याच्या विकास, उद्योग तसेच मेट्रो प्रकल्पाबाबत फडणवीसांची भेट घेतल्याची चर्चा सुरु होती. काहींनी ही भेट फक्त सदीच्छा भेट होती, असेही तर्क लावले.
अदानींवर आहे फसवणुकीचा खटला
उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेत नुकताच फसवणुकीचा खटला दाखल करण्यात आला आहे. एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच दिल्याचा आरोप अदानी यांच्यावर करण्यात आला आहे. हे कंत्राट मिळवून देण्यासाठी २५ कोटी डॉलरची लाच दिल्याचा हा आरोप आहे. अदानी यांनी व त्यांच्या उद्योगसमुहाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
अदानी-फडणवीस भेटीची चर्चा रंगली
सोलार एनर्जी कॉन्ट्रॅक्टसाठी लाच देण्याचा आरोप उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर आहे. दोन हजार दोनशे कोटींची लाच भारतीय अधिकाऱ्यांना देण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. अशातच अदानी यांनी फडणवीसांची भेट घेतल्याने चर्चा वाढल्या आहेत. ही भेट जर कुठल्या प्रकल्पासंदर्भात असेल तर, विरोधक हा मुद्दा पुन्हा चर्चेत आणतील, अशीही शक्यता आहे. मात्र या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, ही माहिती अद्याप समोर आलेली नाही.












Click it and Unblock the Notifications